Abhijeet Dipke: “मला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचाय!” राज्यपाल भवनावर जाण्याची अभिजीत दिपकेंची घोषणा, आता कुणाची विकेट पडणार?
CJP Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके सध्या मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. बालाघाटमध्ये वैद्यकीय असुविधेमुळे बालकांचा बळी गेल्याचा आरोप करत दिपके आक्रमक झाले. सध्या हा मुद्दा राज्यात गाजत आहेत. दिपके यांनी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे(CJP) संस्थापक अभिजीत दिपके हे शनिवारी मध्य प्रदेशातील बालाघाट येथे पोहचले. या जिल्ह्यात काही बालकांच्या मृत्यूनंतर आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आरोप त्यांनी केला. आरोग्य सुविधांअभावी बालकांचा मृत्यू झाल्याच्य घटनेचे शेजारील राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. यावेळी अभिजीत दिपके यांनी मध्य प्रदेश सरकार, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आरोग्य प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे निष्पाप चिमुकल्यांना जीव गमवावा लागला. नैतिक जबाबदारी घेऊन यादव यांनी तात्काळ राजीनामा देण्याची आक्रमक मागणी दिपके यांनी केली.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सला जोरदार टोला
आदिवासी भागात संसर्गजन्य आजारांमुळे काही मुलांचा बळी गेला. आरोग्य सुविधा आणि उपचार मिळत नसल्याची ओरड बालाघाटमध्ये जुनीच आहे. दरम्यान या घटनेनंतर अभिजीत दिपके हे पीडित कुटुंबाच्या भेटीला पोहचले. त्यावेळी काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्संनी त्यांना घेरले. तुम्ही बालकांच्या मृत्यूचे राजकारण करायला आलात का? असा सवाल त्यांनी केला. त्यावर या इन्फ्लुएंसर्सांना त्यांनी जोरदार टोला लगावला. मी आताच मध्य प्रदेशमधील राज्यपाल भवनावर जातो आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो, असा टोला त्यांनी लगावला. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याऐवजी प्रश्नाला वाचा फोडणाऱ्यांनाच चौकशीच्या कटघऱ्यात उभं केलं जात असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
86 आदिवासी मुलं रुग्णालयात भर्ती
अभिजीत दिपके यांनी बालाघाट येथे जात आदिवासी कुटुंबाची भेट घेतली. काही मुलांचा आरोग्य असुविधांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आदिवासी रस्त्यावर उतरल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या आरोग्य यंत्रणेने नंतर 86 मुलांना तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. तोपर्यंत आरोग्य यंत्रणा गाढ झोपेत असल्याचा आरोप दिपके यांनी केला. आतापर्यंत 30 मुलांचा मृत्यू ओढावल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स मुद्दाम या भागात पाठवून सर्व काही आलबेल असल्याचे चित्र रंगवले जात असल्याचा आरोप स्थानिक पत्रकार आणि आदिवासींनी केला आहे. त्यावरही दिपके यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर निशाणा साधला.