
संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली. ही घटना ताजी असतानाच आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. राज्यातील 20 आमदार आज थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. राज्यातील 20 आमदार राष्ट्रपतींना भेटत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमागचे कारण काय? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
राज्यातील सर्वपक्षीय 20 आमदार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात ही भेट होईल. त्यानंतर ही 20 आमदार दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन भेटीमागचं कारण स्पष्ट करतील. तसेच या पत्रकार परिषदेतून अत्यंत महत्त्वाची माहितीही दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यामुळे झिरवळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील हे 20 आमदार राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. आदिवासी समाजासाठी काही ठोस निर्णय घेण्याची मागणी या भेटीत केली जाणार असल्याचं सांगण्यात येतं. राज्यात धनगर समाजाला आदिवासींच्या प्रमाणे आरक्षणाची मागणी वाढत असताना या भेटीला महत्त्व आलं आहे. राज्यात एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तापत असताना या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या भेटीत आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.
1) नरहरी झिरवळ, विधानसभा उपाध्यक्ष
2) विजयकुमार गावित, मंत्री
3) धर्मराव बाबा आत्राम, मंत्री
4) सुनील भुसारा, आमदार
5) नितीन पवार, आमदार
6) दौलत दरोडा, आमदार
7) किरण लहमटे, आमदार
8) हिरामण खोसकर, आमदार
9) शांताराम मोरे, आमदार
10) सहस्रम करोटे, आमदार
11) शिरीशकुमार नाईक, आमदार
12) श्रीनिवास वनगा, आमदार
13) अशोक उईके, आमदार
14) कांशीराम पावरा, आमदार
15) देवराम होली, आमदार
16) कृष्णा गजभिये, आमदार
17) दिलीप बोरसे, आमदार
18) राजेश पडवी, आमदार
19) के सी पडवी, आमदार
20) आमशा पडवी, आमदार