प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारली

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारली

गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने फक्त 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या, तर सहा मंत्रालयांच्या चित्ररथाला परवानगी दिली आहे.

अनिश बेंद्रे

|

Jan 02, 2020 | 1:48 PM

नवी दिल्ली : यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली (Republic Day Maharashtra tableau rejected). गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल क्रमांक पटकावत होता.

येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत इंडिया गेटजवळील राजपथावर पथसंचलन होईल. दरवर्षी निवडक राज्यांच्या चित्ररथांना पथसंचलनाची संधी मिळते. गेली काही वर्ष महाराष्ट्राचा चित्ररथ पथसंचलनात झळकताना दिसतो. महाराष्ट्राच्या चित्ररथाने 2015 नंतर दोन वेळा प्रथम क्रमांकही पटकावला आहे. मात्र 2020 मध्ये चित्ररथाला सादरीकरणाची संधीही मिळणार नाही. मराठी रंगभूमीची 175 वर्ष या संकल्पनेवर यंदा महाराष्ट्र चित्ररथ साकारणार होता.

महाराष्ट्र सरकारसह 32 राज्यांनी चित्ररथाच्या सादरीकरणासाठी केंद्राकडे अर्ज केले होते. परंतु गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने फक्त 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या, तर सहा मंत्रालयांच्या चित्ररथाला परवानगी दिली आहे. संमती नाकारलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह पश्चिम बंगालचा समावेश आहे.

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर भाजपच्या हातून सत्ता निसटली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ‘सीएए’विरोधात मोठं आंदोलन छेडलं होतं. याचेच पडसाद चित्ररथाला परवानगी नाकारुन उमटत असल्याची चर्चा सुरु आहे.

विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालये आणि विभागांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे तज्ञ समितीच्या बैठकीत विविध टप्प्यांवर मूल्यांकन केले जाते. समितीमध्ये कला, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, संगीत, स्थापत्यकला, नृत्य यांचा समावेश असतो. थीम, डिझाइन आणि व्हिज्युअल इफेक्टच्या आधारे प्रस्तावांचे परीक्षण करुन समिती अंतिम निवड करते. यानंतर, सर्वोत्तम चित्ररथांचा परेडमध्ये समावेश होतो.

1980 मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली होती. 1983 मध्ये बैळपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरला होता. 1993 ते 1995 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं होतं. 2015 मध्ये ‘पंढरीची वारी’, तर 2018 मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने अव्वल स्थान पटकावलं होतं. (Maharashtra tableau rejected)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें