
साप पाहिल्यावर अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढतात. अशातच आता उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवरिया जिल्ह्यातील एका व्यक्तीला 40 व्यांदा साप चावला आहे. गौरी बाजार पोलिस स्टेशन परिसरातील भागुआ येथील पासवाना टोला भागात साप पकडत असताना प्रेमचंद नावाच्या व्यक्तीला नाग चावला. त्यामुळे प्रेमचंदची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर सध्या महर्षी देवराह बाबा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, गौरी बाजार परिसरातील प्रेमचंद हा एक सर्पमित्र आहे. त्याने आतापर्यंत 600 पेक्षा जास्त साप पकडले आहेत. अशाच एका सापाला पकडत असताना त्याला 40 व्यांदा साप चावला आहे. सापाने चावा घेतल्यानंतरही प्रेमचंदने तो साप पकडून एका डब्यात बंद केला. त्यानंतर प्रेमचंदला महर्षी देवराह बाबा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत मिळाले माहिती अशी की, पासवान टोला येथील रामभजन पासवान यांच्या घरी एक नाग दिसला. त्यामुळे प्रेमचंदला हा नाग पकडण्यासाठी बोलावण्यात आले. प्रेमचंद घटनास्थळी पोहोचला तेव्हा साप छतावर होता, या सापाला पकडण्यासाठी प्रेमचंद बांबूच्या शिडीच्या मदतीने वर चढला आणि नाग पकडला. छतावरून खाली उतरत असतानाच सापाने वळून प्रेमचंदच्या बोटावर चावा घेतला. यानंतर प्रेमचंदने न घाबरता सापाला प्लास्टिकच्या डब्यात बंद केले. मात्र थोड्या वेळानंतर प्रेमचंदची तब्ब्येत बिघडली.
प्रेमचंद हा व्यक्ती 20 वर्षांपासून साप पकडण्याचे काम करत आहे. साप पकडण्यासाठी तो देवरिया जिल्हा, गोरखपूर-बस्ती विभाग आणि बिहारमध्येही जातो. आतापर्यंत प्रेमचंदने 600 पेक्षा जास्त साप पकडले आहेत. साप पकडल्यानंतर तो त्यांना जंगलात नेऊन सोडतो. याआधी साप पकडत असताना प्रेमचंदला तब्बल 40 वेळा साप चावला आहे. मात्र यानंतरही त्याचा जीव वाचला आहे. 2024 मध्ये प्रेमचंदला एक विषारी साप चावला होता. यामुळे तो बेशुद्ध पडला होता. यानंतर त्याला उपचारासाठी गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होती. काही वेळानंतर डॉक्टरांनी प्रेमचंदला मृत घोषित केले होते. मात्र थोड्या वेळानंतर प्रेमचंद शुद्धीवर आला होता. त्यानंतर प्रेमचंदने पुन्हा एकदा साप पकडण्याचे काम सुरू केले आहे.