
देशातील नागरिकांमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. दररोज चोरी, दरोडा, खून, मारामारी, गोळीबार अशा घटना समोर येत असतात. अशातच आता शुल्लक कारणावरून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आल्याची घटना झारखंडची राजधानी रांचीमधील कांके पिथोरिया रोडवरील शेफ चौपाटी या हॉटेलमध्ये घडली आहे. शाकाहारी बिर्याणीऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्यामुळे झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, रांचीतील कांके पिथोरिया रोडवरील शेफ चौपाटी या रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने शाकाहारी बिर्याणी मागवली होती, मात्र त्याला मांसाहारी बिर्याणी देण्यात आली. यामुळे वाद निर्माण झाला. या वादात शेफ चौपाटी हॉटेलचे मालक विजय कुमार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपी घटना स्थळावरून पळून गेला आहे. पोलीसांनी आता या घटनेचा तपास सुरु केला आहे. आता आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती समोर आली आहे.
चुकीची बिर्याणी दिल्यामुळे ही हत्या झाली आहे. ही बातमी कळताच परिसरात घबराट पसरली आहे. गोळीबार झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी हॉटेल मालक विजयला यांनी रांची येथील रिम्स रुग्णालयात नेले होते, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या हत्येमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, तसेच पोलीसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रांचीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रवीण पुष्कर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. या हत्येमागे फक्त बिर्याणीचे कारण होते की दुसरे काही कारण होते याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी रांचीमधील काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही बारकाईने तपासणी करत आहेत.
या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आक्रमक झाले होता. संतप्त लोकांनी कांके रोड रोखला होता. पोलीसांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रहिवाशांनी रस्ता मोकळा केला. आरोपींना लवकरच अटक करून त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.