
भारताची संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) श्रीलंकेत मोठे काम करणार आहे. ही कंपनी कोलंबो डॉकयार्ड पीएलसी (सीडीपीएलसी) मधील भागेदारी घेणार आहे. हा करार 52.96 दक्षलक्ष अमेरिकन डॉलर (म्हणजे 452 कोटी रुपये) चा आहे. भारताच्या सरकारी शिपयार्ड कंपनीने केलेले हे पहिले अधिग्रहण आहे. या कराराच्या माध्यमातून भारताचा हिंद महासागरात प्रभाव वाढणार आहे. चीनसाठी हा करार जोरदार धक्का असणार आहे.
चीन श्रीलंकेत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच चिनी नौदल हिंदी महासागरात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. चीन या भागात आपल्या जहाजांसाठी तळ शोधत आहे. या परिस्थितीत माझगाव डॉकचा हा करार भारताला या प्रदेशात मोठे स्थान मिळवून देईल. श्रीलंकेत चीनच्या धोरणात्मक घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर हे एक मोठे पाऊल आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी संरक्षण शिपयार्ड कंपनी आहे. या कंपनीने कोलंबो डॉकयार्डमध्ये 51% भागेदारी मिळवण्याच्या करारावर सही केली आहे. हे अधिग्रहण प्राथमिक भांडवली गुंतवणूक आणि दुय्यम शेअर खरेदीच्या संयोजनाद्वारे होणार आहे. ज्यामध्ये जपानच्या ओनोमिची डॉकयार्ड कंपनी लिमिटेडकडून शेअर्सची खरेदी समाविष्ट आहे. चार ते सहा महिन्यांत हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे. करार पूर्ण होताच कोलंबो डॉकयार्ड भारताच्या एमडीएलची सहायक कंपनी बनणार आहे.
एनडीएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, सीडीपीएलसीमधील नियंत्रणात्मक भागभांडवलाचे संपादन हे आपल्या शिपयार्डला जागतिक जहाजबांधणी कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे. दक्षिण आशियामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी एक महत्वपूर्ण दालन म्हणून हा करार असणार आहे. सीडीपीएलसीकडे जहाज निर्माण, देखभाल आणि अभियांत्रिकीचा 50 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. या कंपनीने जपान, नॉर्वे, फॉन्स, यूएई, भारत आणि दक्षिण आफ्रिकी देशांसाठी गुंतागुंतीचे ऑफशोर सपोर्ट वेसल, केबल-लेइंग जहाज, टँकर आणि गस्ती घालणाऱ्या नौका बनवल्या आहेत.