Adi Vaani: आदिवासींसाठी AI आधारित आदिवासी भाषा ट्रान्सलेटर सुरु होणार, आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा निर्णय

भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालय आदिवाणी या भारतातील पहिल्या एआय-आधारित आदिवासी भाषा ट्रान्सलेटरची बीटा आवृत्ती 1 सप्टेंबरला लाँच करण्याची घोषणा केली आहे. याची माहिती जाणून घेऊयात.

Adi Vaani: आदिवासींसाठी AI आधारित आदिवासी भाषा ट्रान्सलेटर सुरु होणार, आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा निर्णय
Aadi Vani
| Updated on: Aug 30, 2025 | 7:29 PM

आपला भारत विकसित देश बनण्याकडे वाटचाल करत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील भाषिक विविधतेकडे आणि आदिवासी सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालय आदिवाणी या भारतातील पहिल्या एआय-आधारित आदिवासी भाषा ट्रान्सलेटरची बीटा आवृत्ती 1 सप्टेंबरला लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे ट्रान्सलेटर आदिवासी अभिमान वर्षांतर्गत विकसित करण्यात आले आहे. आदिवासी भागातील भाषिक आणि शैक्षणिक व्याख्या बदलण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

आदिवाणी काय आहे?

आदिवाणी हे एक एआय-आधारित ट्रान्सलेशनचे माध्यम आहे. आदिवाणीचे उद्दिष्ट प्रगत एआय तंत्रज्ञान वापरून आदिवासी भाषा आणि संस्कृतींचे जतन करणे, तिला प्रोत्साहन देणे आणि तिचे पुनरुज्जीवन करणे हे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 461 आदिवासी भाषा बोलल्या जातात, ज्यामध्ये 71 विशिष्ट आदिवासी मातृभाषा आहेत. यातील 81 भाषा असुरक्षित आहेत, तर 42 भाषा धोक्यात आहेत.

आता आदिवाणी एआय वापरून आदिवासी भाषांचे पद्धतशीरपणे डिजिटायझेशन, जतन आणि पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आदिवाणी विकसित करण्यासाठी झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मेघालय येथील आदिवासी संशोधन संस्था (TRIs) तसेच आयआयटी दिल्ली, बिट्स पिलानी, IIIT हैदराबाद आणि IIIT नवा रायपूर या संस्थांनी योगदान दिलेले आहे.

आदिवाणी बीटा आवृत्तीमध्ये संथाली (ओडिशा), भिली (मध्य प्रदेश), मुंडारी (झारखंड), गोंडी (छत्तीसगड) या भाषांचा समावेश आहे. पुढील टप्प्यात कुई आणि गारो भाषा जोडल्या जाणार आहेत.

आदिवाणीची वैशिष्ट्ये

कमी संसाधन असलेल्या आदिवासी भाषांसाठी नो लँग्वेज लेफ्ट बिहाइंड (एनएलएलबी) आणि इंडिकट्रान्स 2 सारख्या मॉडेल्सचा वापर करण्यात आला आहे. यात डेटा संकलनही करता येणार आहे.

काय सेवा मिळणार?

आदिवाणीमध्ये मजकूर-ते-मजकूर, मजकूर-ते-भाषण, भाषण-ते-मजकूर, भाषण-ते-भाषण असे भाषांतर करता येणार आहे. यात हस्तलिखिते आणि पुस्तकांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (ओसीआर) देण्यात आले आहे. यात पंतप्रधानांचे भाषण, आरोग्यविषयी सल्ला आणि आदिवासींसाठी असलेल्या सरकारी योजनांची माहितीही मिळणार आहे.

भविष्यातील उपक्रम काय असेल?

  • आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक अभिव्यक्तींचे डिजिटलायझेशन आणि जतन करणे.
  • आदिवासींना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण, आरोग्यसेवा प्रदान करणे.
  • सरकारी योजनांची माहिती पोहोचवणे
  • एआयद्वारे धोक्यात असलेल्या भाषांचे जतन करण्यात भारताचा जागतिक स्तरावर सहभाग वाढवणे

आदिवाणी हा उपक्रम भारतातील सांस्कृतिक विविधता आणि समानता या संवैधानिक मूल्यांना बळकटी देतो. त्याचबरोबर डिजिटल इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, आदिकर्मयोगी अभियान, धरती आबा जनजाति ग्राम उत्कर्ष अभियान आणि पंतप्रधान जनमन यासारख्या प्रमुख राष्ट्रीय योजनांचाही प्रसार करत आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने नागरिक, शिक्षक, कार्यकर्ते आणि आदिवासी समुदायांना भारताच्या आदिवासी भाषिक वारशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी या प्रयत्नात सामील होण्याचे आवाहन केले आहे.