
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेला चित्रपट निर्माता महेश जिरावालाच्या मृत्यूची अखेर पुष्टी झाली आहे. डीएनए चाचण्यांचा अहवाल जुळल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. 34 वर्षीय महेश हा अहमदाबाद दुर्घटनेपासून बेपत्ता होता. विशेष म्हणजे अपघाताच्या वेळी तो संबंधित एअर इंडियाच्या विमानात किंवा ते विमान ज्या हॉस्टेलवर कोसळलं त्यातही नव्हता. त्याच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हॉस्टेलपासून 700 मीटर अंतरावर दिसून आलं होतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली होती.
12 जून रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचं AI 171 बोइंग 787-8 ड्रीमलायनर विमान अहमदाबादमधल्या मेघानी नगर इथल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं होतं. ज्यावेळी हे विमान हॉस्टेलवर कोसळलं, त्याचवेळी महेश हॉस्टेलच्या जवळून त्याच्या दुचाकीवरून घरच्या दिशेने जात होता. सेक्टर 2 चे सह पोलीस आयुक्त जयपालसिंह राठोड यांनी सांगितलं की, डीएनए चाचणीद्वारे महेश जिरावाला यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
महेशचं निधन त्या अपघातात होऊ शकतं, यावर अजूनही त्याच्या कुटुंबीयांना विश्वास बसत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची शंका दूर करण्यासाठी तो ज्या रस्त्यावर होता, तिथले सीसीटीव्ही फुटेज आणि जळालेल्या त्यांच्या स्कूटरचे पुरावे गोळा केले. “डीएनए चाचणीत त्याची ओळख पटल्यानंतर शुक्रवारी महेश जिरावालाच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. आगीत जळून खाक झालेली त्याची स्कूटरही अपघातस्थळाच्या जवळ सापडली. स्कूटरच्या इंजिनचं नंबरसुद्धा त्याच्या स्कूटरच्या नोंदणी कागजपत्रांशी जुळत होता”, असं राठोड यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
महेशचा छोटा भाऊ कार्तिक याविषयी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाला, “तो गुरुवारी दुपारी 1.10 वाजताच्या सुमारास पत्नी हेतलशी फोनवर बोलला होता. लॉ गार्डनजवळील मिटींग संपल्याची माहिती त्याने पत्नीला दिली होती. फोनवर दोघांची थट्टामस्करीही झाली होती. त्यानंतर नरोडा इथल्या निवासस्थानाकडे निघत असल्याचं त्याने हेतलला सांगितलं होतं.” फोन केल्याच्या तासाभरानंतरही महेश घरी न परतल्याने हेतलने त्याचा नंबर डाएल केला. तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ असल्याचं समजलं. हेतलने त्याला सतत फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा नंबर स्वीच ऑफच येत होता.