
Mock Drill : पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही क्षणी पाकिस्तानविरोधात युद्ध चालू होण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण भारतात 7 मे रोजी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. युद्धात नागरिकांनी स्वत:ची काळजी कशी घ्यायची, यासाठी ही मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहे. दरम्यान, याच दिवशी एकीकडे मॉक ड्रिल चालू असताना दुसरीकडे भारताचे वायू दल मोठी कामगिरी करणार आहे. वायू दलाच्या या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या वायू दलाने एक NOTAM जारी केला आहे. या NOTAM नुसार भारताचे हवाई दल येत्या 7 मे रोजी युद्धाभ्यास करणार आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तानच्या सीमेवरच हा युद्धाभ्यास चालू होणार आहे. भारत-पाकिस्तानच्या दक्षिणी सीनेवर वायूदलाची वेगवेगळी लढाऊ विमानं आकाशात घिरट्या घालणार आहे. या सीमाभागात वाळवंटाचे क्षेत्र असलेल्या ठिकाणी हा युद्धाभ्यास केला जाईल. वायू दलाने दिलेल्या माहितीनुसार राफेल, मिराज 2000 आणि सुखोई-30 यासारख्या अत्याधुनिक विमानांचा या युद्धाभ्यासात समावेश असेल. सीमाभागातील अनेक जिल्ह्यांत हा युद्धाचा अभ्यास केला जाणार आहे.
NOTAM याचा अर्थ नोटीस टू एअर मिशन सिस्टम असा होतो. या नोटिशीच्या माध्यमातून पायलट, ट्रॅफिक कंट्रोलर यांच्यासाठी एक संभाव्य धोक्यांची माहिती देणारी सूचनाच असते. युद्धाभ्यास करताना कोणतीही अडचण येऊ नये त्यामुळे NOTAM च्या माध्यमातून सूचना दिली जाते. नोटमला आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण अधिनयांच्या अधीन राहूनच जारी केलं जातं.
दरम्यान, एकीकडे वायूसेनेचा युद्धाभ्यास चालू असताना देशात याच दिवशी साधारण 295 जिल्ह्यांत मॉक ड्रिल केले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचना दिल्या आहेत. पाकिस्तानसोबतची संभाव्य युद्धाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या मॉक ड्रिलच्या दरम्यान नागरिकांना युद्धात कशी काळजी घ्यायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवले जाईल. तसेच या दिवशी रेड सायरनही वाजवले जाईल. सोबतच मॉक ड्रिलदरम्यान ब्लॅकआऊटही केले जाणार आहे.