मंगोलियाच्या राष्ट्रपतींनी दिली दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट, शांती आणि कल्याणासाठी केली प्रार्थना

Swaminarayan Akshardham: मंगोलियाचे राष्ट्रपती उखनागीन खुरेलसुख यांनी आपल्या भारत दौऱ्यात नवी दिल्लीतील BAPS स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट दिली. यावेळी परराष्ट्र मंत्री बत्सेतसेग बटमुंख, राजदूत गणबोल्ड दंबाजव आणि मंगोलियाच्या शिष्टमंडळाचे सदस्य होते.

मंगोलियाच्या राष्ट्रपतींनी दिली दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट, शांती आणि कल्याणासाठी केली प्रार्थना
Mangolian President visited Baps
| Updated on: Oct 15, 2025 | 5:43 PM

मंगोलियाचे राष्ट्रपती उखनागीन खुरेलसुख यांनी आपल्या भारत दौऱ्यात नवी दिल्लीतील BAPS स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट दिली. यावेळी परराष्ट्र मंत्री बत्सेतसेग बटमुंख, राजदूत गणबोल्ड दंबाजव आणि मंगोलियाच्या शिष्टमंडळाचे सदस्य होते. BAPS स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक प्रमुख परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या वतीने धर्मवत्सलदास स्वामी, दिव्यमूर्तिदास स्वामी आणि ज्ञानमूर्तिदास स्वामी यांनी राष्ट्रपती उखनागीन खुरेलसुख आणि इतर अधिकाऱ्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले.

आपल्या या भेटीत उखनागीन खुरेलसुख यांनी स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराती पाहणी केली, तसेच श्री नीलकंठ वर्णीचा अभिषेक करत भारत आणि मंगोलियाच्या लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यानंतर परमपूज्य महंत स्वामी महाराजांकडून खुरेलसुख यांना एक शुभेच्छा पत्र देण्यात आले. यात त्यांच्या भेटीची प्रशांसा करण्यात आली, तसेच मंगोलियन लोकांमध्ये शांती, करुणा आणि एकता वाढवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. तसेच खुरेलसुख यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करण्यात आली, त्याचबरोबर भारत आणि मंगोलियामधील मैत्री आणखी मजबूत व्हावी अशी इच्छा व्यक्त करण्यात आली.

यावेळी बोलताना राष्ट्रपती उखनागीन खुरेलसुख यांनी भारत आणि मंगोलियामधील जुन्या संबंधांवर प्रकाश टाकला. खुरेलसुख म्हणाले की, ‘भारतातील लोकांचे हृदय गंगा नदीइतके शांत आणि सौम्य आहे आणि मंगोलियातील लोक मंगोलियन गवताच्या मैदानांप्रमाणे विशाल आहे. हे नाते हुन्नु साम्राज्याच्या काळापासूनचे आहे. आज या मंदिरात आल्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. हे मंदिर अध्यात्म, धर्म, परंपरा, इतिहास आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. हे असे एक मंदिर आहे जे भारतीय लोकांच्या खोल आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. ‘

राष्ट्रपती उखनागीन खुरेलसुख यांनी अक्षरधाम येथे मिळालेल्या अनुभवाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी परमपूज्य महंत स्वामी महाराजांचे पत्र, आशीर्वाद आणि प्रार्थना याबद्दल आभार मानताना म्हटले की, ‘अध्यात्म आणि सकारात्मकता अशा अभिव्यक्तींमुळे भारत आणि मंगोलियामधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होत आहेत.’

मंगोलियन राष्ट्रपतींची ही भेट भारत आणि मंगोलियामधील सामाजिक वारसा, संस्कृती आणि वैश्विक मूल्यांवर भाष्य करते. भारताच्या राजधानीत स्वामीनारायण अक्षरधाम हे प्रसिद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे, जे भक्ती, सेवा आणि एकता यासारख्या मूल्यांचे प्रतीक आहे, यातून जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा मिळत आहे.