मृत्यूच्या विळख्यातही सुटली नाही मायेची साथ! 12 तास काळजाला चिटकून राहिले माय-लेक, काळीज पिळवटून टाकणारी घटना

जबलपूर बर्गी धरण दुर्घटनेतून बचाव पथकांनी आई आणि मुलाचा मृतदेह बाहेर काढले आहे. दुर्घटनेच्या 12 तासांनंतर ही आईची मिठी सैल झाली नाही. आग्रा येथील एक डायव्हिंग टीम अत्यंत अरुंद आणि धोकादायक परिस्थितीत शोधमोहीम राबवत आहे. आतापर्यंत नऊ मृतदेह सापडले असून, सहा जण अद्याप बेपत्ता आहेत.

मृत्यूच्या विळख्यातही सुटली नाही मायेची साथ! 12 तास काळजाला चिटकून राहिले माय-लेक, काळीज पिळवटून टाकणारी घटना
बर्गी धरण
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 01, 2026 | 10:38 AM

बरगी धरणामध्ये झालेला क्रूझ अपघात आता केवळ एक दुर्घटना उरली नसून, काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. शुक्रवारी जेव्हा आग्रा येथून आलेल्या डायव्हिंग टीमने बचाव कार्य (रेस्क्यू ऑपरेशन) सुरू केले, तेव्हा पाण्याच्या खोलीत असे दृश्य दिसले जे पाहून अनेकांचे डोळे पाणावले. खोल पाण्यात बुडालेल्या क्रूझच्या ढिगाऱ्यात एका मातेचा मृतदेह सापडला, जिने आपल्या निष्पाप बाळाला छातीशी इतक्या घट्टपणे कवटाळले होते की मृत्यूलाही त्यांची पकड सैल करता आली नाही.

बचाव पथकाच्या सदस्याने सांगितले की, ऑपरेशन दरम्यान जेव्हा ते क्रूझच्या आत शिरले, तेव्हा एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. नंतर समजले की, त्या माऊलीने मरणापर्यंत आपल्या बाळाला सुरक्षा कवचाप्रमाणे घट्ट मिठी मारून पकडून ठेवले होते. साधारण 12 तासांपर्यंत ती माता आपल्या लेकाला छातीशी लावून पाण्याच्या खोल अंधारात सामावलेली होती. डायव्हिंग टीमच्या म्हणण्यानुसार, क्रूझच्या आत विजिबिलिटी शून्य होती आणि लोखंडी सळ्या व तुटलेल्या सांगाड्यांमधून या माय-लेकांना बाहेर काढणे हा सर्वात भावूक क्षण होता.

अरुंद जागेत संघर्ष

आग्रा येथून आलेल्या पॅरामिलिट्री डायव्हिंग टीमसाठी हे ऑपरेशन एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही. टीमच्या सदस्याने सांगितले की, क्रूझचा सांगाडा पूर्णपणे खचला आहे. ग्रील आणि लोखंडी पत्र्यांमुळे रस्ता इतका अरुंद झाला आहे की, एक डायविंग टीमचा सदस्य मध्येच अडकला होता. ढिगारा फोडून आत अडकलेल्या मृतदेहांपर्यंत पोहोचण्यासाठी टीमला हातोड्यांचा वापर करावा लागत आहे. क्रूझचे टोकदार लोखंडी भाग डायव्हर्ससाठी जीवघेणे ठरत आहेत.

‘पर्यटकांचा जीव बनला कमाईचे साधन’

या अपघातातून जिवंत वाचलेल्या दिल्लीच्या संगीता कोरी यांनी सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले. त्यांनी सांगितले की, संध्याकाळी 6 वाजता जेव्हा वादळ आले, तेव्हा क्रूझवर कोणीही लाईफ जॅकेट घातले नव्हते. वास्तविक, कोणालाही जॅकेट देण्यातच आले नव्हते. जेव्हा पाणी भरू लागले, तेव्हा स्टोअर रूमचे कुलूप तोडून जॅकेट वाटण्यात आले, पण तोपर्यंत क्रूझ उलटली होती. स्थानिक लोकांच्या इशाऱ्यांकडे चालकाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही संगीता यांनी केला आहे.

आतापर्यंत 9 मृतदेह हाती

शुक्रवार संध्याकाळपर्यंतच्या माहितीनुसार, ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. सैन्य आणि NDRF ची पथके हायड्रोलिक मशीन आणि गॅस कटरच्या साहाय्याने क्रूझ कापून रस्ता तयार करत आहेत. राज्याचे मंत्री राकेश सिंह आणि धर्मेंद्र लोधी घटनास्थळी उपस्थित असून या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.

Follow Us