
हिमाचल प्रदेशात मोठा अपघात झाला आहे. बिलासपूर जिल्ह्यात आज (मंगळवार) सायंकाळी भल्लू पुलावर एका बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला. या घटनेत मातीखाली दबून बसमधील पंधरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले असू मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. सध्या घटनास्थशी पोलीस आणि प्रशासनाचे पथकही पोहोचले असून जेसीबीच्या मदतीने माती हटवली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मंगळवारी सायंकाळी झंडुता विधानसभा मतदारसंघातील बार्थिन येथील भल्लू पुलावरून एक बस जात होती. या बसमधून जवळपास 30 प्रवासी प्रवास करत होते. बस पुलावर येताच अचानक डोंगराला तडा गेला आणि मातीचा ढिगारा बसवर पडला. यामुळे बसमधील प्रवासी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
या घटेनेची माहिती मिळताच पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या जेसीबीच्या मदतीने बसवरील माती हटवली जात आहे. काही जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळीच सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. उर्वरित 9 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बसमधून तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या मदतकार्य सुरु आहे.
या घटनेवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शोक व्यक्त केला आहे. सुखू यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना केली. या कठीण काळात राज्य सरकार पीडित कुटुंबांसोबत ठामपणे उभे आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे बिलासपूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. सुखू यांनी मदत आणि बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्या उपचारांसाठी पुरेशी व्यवस्था करण्याचेही निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.