इंदिरा गांधी, वाजपेयी, आडवाणींविरोधात निवडणूक लढणाऱ्या इलेक्शन मॅनचा मृत्यू; 280 निवडणुका लढणारे धरतीपकड कोण?

नागरमल बाजोरिया ऊर्फ 'धरतीपकड' यांचे 97 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी वॉर्डापासून राष्ट्रपतीपदापर्यंत 280 निवडणुका लढण्याचा विक्रम केला. इंदिरा गांधी, वाजपेयींसारख्या दिग्गजांविरोधातही ते लढले, पण कधीही जिंकले नाहीत. अनोख्या प्रचारामुळे ते नेहमी चर्चेत राहिले. त्यांच्या निधनाने देशातील निवडणुकांचा एक अविस्मरणीय साक्षीदार हरपला आहे.

इंदिरा गांधी, वाजपेयी, आडवाणींविरोधात निवडणूक लढणाऱ्या इलेक्शन मॅनचा मृत्यू; 280 निवडणुका लढणारे धरतीपकड कोण?
Dharti Pakad Nagarmal Bajoria
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2026 | 11:57 AM

वॉर्डाच्या निवडणुकीपासून ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणूक लढण्याचा विक्रम करणारे नागरमल बाजोरिया ऊर्फ धरतीपकड यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी बिहारच्या पटना येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 97 वर्षाचे होते. धरतीपकड यांनी एकूण 280 निवडणुका लढवल्या होत्या. इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत अनेक दिग्गजांच्या विरोधात त्यांनी निवडणुका लढल्या होत्या. प्रत्येक निवडणूक लढण्याच्या त्यांच्या त्यांच्या निर्णयामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले होते. त्यांच्या निधनामुळे देशातील सार्वत्रिक निवडणुकांचा एक साक्षीदार हरपला आहे.

गुरुवारी रात्री 9 वाजता धरतीपकड यांचं पार्थिव पटना येथून भागलपूरला आणण्यात आलं. तिथे पवित्र बरारी घटावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. धरतीपकड यांना चार मुलं आणि एक मुलगी आहे. यापैकी एक मुलगा विजय बाजोरिया यांचं पूर्वीच निधन झालं आहे. त्यांची तीन मुले सतीश, अजय आणि दिलीप हे कॉस्मेटिकचा व्यवसाय सांभाळतात.

प्रणवदांच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न

नागरमल बाजोरिया ऊर्फ धरतीपकड हे भागलपूरच्या एमपी द्विवेदी रोडवरील देवी बाबू धर्मशाळेच्या जवळ राहत होते. धरतीपकड यांनी 2012मध्ये प्रणव मुखर्जी यांच्या विरोधात राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता. त्यांनी यापूर्वी 1969मध्ये व्ही. व्ही. गिरी यांच्या विरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती. धरतीपकड यांनी त्यांची शेवटची निवडणूक 2019मध्ये लढवली होती. विशेष म्हणजे वॉर्डापासून राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या धरतीपकड यांना कोणत्याच निवडणुकीत यश मिळालं नव्हतं. धरतीपकड हे कॉस्मेटिकचा व्यापार करायचे. तसेच समाजसेवेतही ते आग्रणी होते. धरतीपकड यांनी इंदिरा गांधींविरोधात रायबरेलीतून, राजीव गांधींविरोधात अमेठीतून, संजय गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी आदी दिग्गज नेत्यांविरोधातही निवडणूक लढली आहे.

गाढवावरून रॅली…

नागरमल बाजोरिया केवळ सर्वाधिक निवडणूक लढल्यानेच प्रसिद्ध नव्हते. तर त्यांच्या अनोख्या निवडणूक प्रचारानेही ते नेहमी चर्चेत राहायचे. त्यांच्या कपड्यांवरील स्लोगन आणि त्यांची अनोखी रॅली नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घ्यायची. 2005मध्ये एका निवडणुकीत त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात नामांकन रॅली काढली होती. स्टेशन चौकात ही अनोखी रॅली पाहण्यासाठी तुंबड गर्दी जमली होती. या रॅलीत त्यांनी गाढवं आणली होती आणि राजकीय टिप्पणी करणारे फलक या गाढवांच्या गळ्यात त्यांनी लटकवले होते. त्यामुळे ही रॅली अधिकच चर्चेत आली होती.

पाकिस्तानातून आले…

नागरमल बाजोरिया यांचा जन्म 1930 रोजी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झाला. तेव्हा लाहोर भारताचा एक भाग होता. पण बाजोरिया कुटुंब स्वातंत्र्यापूर्वीच भागलपूरमध्ये आले. संपूर्ण देशात 280 निवडणुका लढणारे ते एकमेव व्यक्ती होते. आरोग्य, महिलांच्या समस्या, शिक्षण आणि वृद्धांच्या सेवेमध्ये ते नेहमी तत्पर असायचे. गोरगरीबांना मदत करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us