‘माझ्यासाठी पक्षाच्या आधी देश…’, काँग्रेसकडून निष्ठेच्या टीकेनंतर शशी थरुर यांचे वक्तव्य
मी माझ्या मुद्यांवर ठाम राहीन, कारण मला वाटते की ही देशासाठी योग्य गोष्ट आहे. देश प्रथम हे नेहमीच माझे तत्वज्ञान राहिले आहे. त्यासाठीच मी भारतात परतलो आहे.

कोणत्याही पक्षाचे उद्दिष्ट एक चांगला भारत निर्माण करणे आहे. माझ्यासाठीही देश प्रथम येतो. देशाच्या सशस्त्र दलांना आणि सरकारला पाठिंबा देण्याची आपली भूमिका कायम राहणार आहे. कारण राष्ट्र सर्वोच्च आहे. पक्ष हे देशाला चांगले बनवण्याचे साधन आहेत, असे तिरुअनंतपुरमचे खासदार आणि काँग्रेसच्या संसदीय समितीचे सदस्य शशी थरूर यांनी सांगितले. कोणत्याही पक्षाचे उद्दिष्ट एक चांगला भारत निर्माण करणे आहे आणि हे लक्ष्य साध्य करण्याच्या सर्वोत्तम मार्गावर पक्षांना मतभेद करण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसकडून शशी थरुर यांच्या पक्षनिष्ठेबद्दल टीका करण्यात आली होती.
मी माझ्या मुद्यांवर ठाम
शांतता, सौहार्द आणि राष्ट्रीय विकास विषयावरील कार्यक्रमात बोलताना शशी थरूर यांनी सांगितले की, अलिकडे घडलेल्या घटनेनंतर मी सशस्त्र दलांना आणि आपल्या सरकारला पाठिंबा दिल्यामुळे अनेकांनी माझ्या भूमिकेवर खूप टीका केली आहे. पण मी जेव्हा भारताबद्दल बोलतो तेव्हा मी सर्व भारतीयांबद्दल बोलतो. मी माझ्या मुद्यांवर ठाम राहीन, कारण मला वाटते की ही देशासाठी योग्य गोष्ट आहे. देश प्रथम हे नेहमीच माझे तत्वज्ञान राहिले आहे. त्यासाठीच मी भारतात परतलो आहे. राजकारणातून आणि राजकारणाबाहेरुन शक्य तितक्या सर्व प्रकारे देशाची सेवा करू शकेन. मी त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकारणावर बोलणार नाही…
काँग्रेस हायकमांडशी मतभेद आहे का? यावर शशी थरूर म्हणाले की, मी येथे कोणत्याही राजकारणावर किंवा समस्येवर चर्चा करण्यासाठी आलेले नाहीत. मी दोन भाषणे देण्यासाठी आलो आहे. दोन्ही भाषणे अशा विषयांवर होती ज्यांचा मला आशा आहे की जनता त्यांचा आदर करेल आणि त्यांना महत्त्व देईल. पहिले भाषण विकास, व्यवसायांची भूमिका आणि शांतता आणि सुसंवादावर आहे. दुसरे भाषण प्रामुख्याने जातीय सलोखा आणि एकत्र राहण्याच्या प्रयत्नांवर केंद्रित होते. माझ्या १६ वर्षांच्या राजकारणात सर्वसमावेशक विकास हा माझा मंत्र राहिला आहे. मी समावेशकता आणि विकासावर विश्वास ठेवतो. मी राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय हितावर देखील विश्वास ठेवतो, असे त्यांनी म्हटले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर म्हणाले की, कधीकधी पक्षाला असे वाटते की आपल्या काही कृती किंवा विधानांमुळे पक्षावरील आपली निष्ठा कमी होते. परंतु त्यांच्या मते भारत पक्षापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च आहे.
