Big Breaking | शरद पवार यांना मोठा धक्का, आणखी सात आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा

अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून भाजपसोबत सत्तेत गेले आहेत. मात्र शरद पवार यांनी आपण पुरोगामी विचारांना पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

Big Breaking | शरद पवार यांना मोठा धक्का, आणखी सात आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा
| Updated on: Jul 20, 2023 | 8:38 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून भाजपसोबत सत्तेत गेले आहेत. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीकडे मंत्रिमंडळातील अर्थ, सहकार आणि कृषीसारखी महत्त्वाची खाती आहेत. मात्र शरद पवार यांनी आपण पुरोगामी विचारांना पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या आणखी सात आमदारांना अजित पवारांनी फोडलं आहे.

कोणत्या आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा?

नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाहीतर नागालँडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीदेखी अजित पवारांसोबत असल्याचं सांगितलं आहे. आमदारांसोबत पदाधिकाऱ्यांनीसुद्धा अजित पवारांना पाठिंबा दिल्याने शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर धक्का असल्याचं बोललं जात आहे.

नागालँडची विधानसभा निवडणूक आताच पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादीला सात जागांवर यश मिळालं होतं. नामरी नचांग, पिक्टो, एस. तोइहो येप्थो, वाय. म्होंबेमो हूमत्सो, वाय. मानखा ओकोन्याक, ए पोंगशी फोम आणि पी लॉन्गॉन या राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता.

नागालँडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याामुळे अजित पवार गटाची ताकद आणखीन वाढली आहे. शरद पवार यांनीच आपल्या आमदारांना सत्तेत बसवत नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला होता. भाजपला 12 जागा मिळाल्या होत्या तर नँशनल डेमाँक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीला सर्वाधिक 25 जागा मिळाल्या होत्या. दोघांनी मिळून सरकार स्थपान केलं होतं. इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे.