देशात आघाडी पॉलिटिक्स जोरात, 2 वर्षात किती पक्ष भाजप प्रणीत NDA सोबत आले आणि किती काँग्रेसच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडले?
एका बाजूला भाजपच्या नेतृत्वाखालील NDA चा विस्तार, तर दुसरीकडे INDIA आघाडीतील पक्षांची साथ सुटतेय! AIADMK, अकाली दलासह कोणत्या पक्षांनी NDA मध्ये प्रवेश केला? DMK आणि आपची भूमिका काय?

देशाच्या राजकारणात सध्या नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर NDA च्या विस्ताराला वेग आला आहे. गेल्या दोन वर्षांत चार पक्षांनी NDA सोबत जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीतून दोन प्रमुख पक्षांनी अंतर ठेवलं आहे. त्यामुळे आगामी काळात देशातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी भाजपची साथ सोडलेला एक मोठा पक्ष पुन्हा NDA मध्ये परतला आहे.
NDA मध्ये चार पक्षांची भर
गेल्या दोन वर्षांत भाजपप्रणीत NDA मध्ये चार पक्ष सहभागी झाले आहेत. यामध्ये तामिळनाडूमधील AIADMK, टीएमसी (मूपनार), पूरची भारत पार्टी आणि पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचा समावेश आहे.
यातील शिरोमणी अकाली दलाच्या पुनरागमनाची विशेष चर्चा होत आहे. भाजप आणि अकाली दल यांची यापूर्वी अनेक वर्षे युती होती. मात्र, 2020 मध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर अकाली दलाने NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता जवळपास सहा वर्षांनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत.
इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद
एकीकडे NDA चा विस्तार होत असताना दुसरीकडे इंडिया आघाडीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. आम आदमी पार्टी आणि द्रमुक या दोन प्रमुख पक्षांनी इंडिया आघाडीपासून अंतर ठेवलं आहे.
जुलै 2025 मध्ये आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. काँग्रेससोबतचे मतभेद आणि आघाडीतील एकजुटीचा अभाव ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं सांगण्यात आलं. तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या भूमिकेमुळेही इंडिया आघाडीच्या एकजुटीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
NDA चं संख्याबळ 39 वर
शिरोमणी अकाली दलाच्या पुनरागमनानंतर NDA मधील पक्षांची संख्या 39 झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलं नव्हतं. त्यामुळे केंद्रातील सरकार चालवण्यासाठी मित्रपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मित्रपक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर इंडिया आघाडीतील मतभेद विरोधकांसाठी अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळे देशातील आघाड्यांच्या राजकारणात आगामी काळात आणखी कोणते बदल होतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.