
देशाची राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सोमवारी पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. यामुळे दिल्लीतील जनता साखर झोपेत असताना अनेकजण खडबडून जागे झाले. यामुळे दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पहाटे ५.३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याचे केंद्र दिल्लीच्या जवळच जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर होते. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला.
दिल्लीत अचानक झालेल्या या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे साखरझोपेत असताना अचानक जमीन हलत असल्याचे जाणवण्यास सुरुवात झाली. यानंतर दिल्लीकरांनी खबरदारी म्हणून तात्काळ घराबाहेर पडण्यास सुरुवात केली. दिल्ली-एनसीआरसह शेजारील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.
An earthquake with a magnitude of 4.0 on the Richter Scale hit New Delhi at 05:36:55 IST today
(Source – National Center for Seismology) pic.twitter.com/KXIw8qRO6T
— ANI (@ANI) February 17, 2025
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र दुर्गाबाई देशमुख विशेष शिक्षण महाविद्यालयाजवळील धौला कुआं या ठिकाणी होते. पहाटे ५:३६ वाजता झालेला हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर होता. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नवी दिल्लीतील हा भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या भागाजवळ एक तलाव आहे. या ठिकाणी दर दोन ते तीन वर्षांनी भूकंप होतात. एका अधिकाऱ्याने सांगितले की, २०१५ मध्येही या भागात ३.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक उंच इमारतीमधील लोक घराबाहेर पडले.
दिल्ली पोलिसांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित असाल. आपत्कालीन परिस्थितीत ११२ हेल्पलाइनवर कॉल करा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.