देशाला हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडातील सुरेंद्र कोलीने उचललं टोकाचं पाऊल; चहाच्या दुकानातच…

निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोलीने हरिद्वारमधील आपल्या चहाच्या दुकानात गळफास घेऊन आयुष्य संपवले. सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता मिळूनही त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आत्महत्येचे कारण अज्ञात आहे.

देशाला हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडातील सुरेंद्र कोलीने उचललं टोकाचं पाऊल; चहाच्या दुकानातच...
Surendra Koli
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 3:21 PM

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोलीने आयुष्य संपवलं आहे. कोली हरिद्वारच्या भूपतवाला परिसरात राहत होता. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने या परिसरात चहाचं दुकान थाटलं होतं. याच चहाच्या दुकानात त्याने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. कोलीने टोकाचं पाऊल का उचललं? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र, तुरुंगातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही त्याने जीवन का संपवलं? यावर वेगवेगळे तर्क वर्तवले जात आहेत.

सुरेंद्र कोलीने आयुष्य संपवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. निठारी हत्याकांडात सुरेंद्र कोली आरोपी होता. या प्रकरणातून त्याची मुक्तता झाली होती. मात्र, त्याने अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचा पोलीस तपास करत आहेत.

पोलीस अधिकारी कुंदनसिंह राणा यांनी मीडियाशी संवाद साधून याबाबतची माहिती दिली. सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास याबाबतचा आम्हाला फोन आला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी आलो. मृतकाचं आयडेंटीटी कार्ड चेक केलं. त्यावर सुरेंद्र कोली असं नाव लिहिलेलं होतं. निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोलीशी हे आयडी कार्ड जुळतं. त्याने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे, असं कुंदनसिंह राणा यांनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

निठारी हत्याकांडाशी संबंधित शेवटच्या प्रकरणात सुरेंद्र कोलीला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. 11 नोव्हेंबर 2025 रोजी कोर्टाने या प्रकरणातून त्याची मुक्तता केली होती. कोलीला दोषी ठरवण्यासाठी आणि शिक्षा सुनावण्याकरता मागच्या कोर्टांनी ज्या पुराव्यांना आधार मानलं होतं, ते पुरावे कायद्याच्या कसोटीवर बसत नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं होतं. कोर्टाच्या मते, कोलीविरोधातील पुरावे अवैध होते, विश्वासहार्य नव्हते. तसेच विरोधाभासीही होते.

काय आहे प्रकरण?

निठारी परिसरात 2005-06 मध्ये मुलं आणि महिला बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली होती. वारंवार या घटना घडत असल्याने पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता. त्यानंतर 29 डिसेंबर 2006 रोजी सेक्टर-31 मधील व्यावसायिक मोनिंदर सिंग पंढेरच्या D-5 या कोठीपर्यंत पोलीस पोहोचले. पोलिसांनी या कोठीच्या आसपासच्या परिसरात कसून तपासणी केली. त्यावेळी नाल्यात आणि आसपासच्या परिसरात मानवी खोपड्या, हड्ड्या, कपडे आणि इतर वस्तू सापडल्या.

या गोष्टी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मोनिंदरसिंग पंढेर आणि त्याचा कौटुंबिक सहायक सुरेंद्र कोलीला अटक केली होती. त्यानंतर जानेवारी 2007मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. पोलिसांनी बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांसह वेगवेगळ्या प्रकरणाचे वेगवेगळे 19 एफआयआर नोंदवले होते. त्यातील 16 प्रकरणात सीबीआयने चार्जशीट दाखल केली होती. चौकशीत दुष्कर्म, अपहरण आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप कोलीवर ठेवण्यात आले होते.

या प्रकरणात सहआरोपी मोनिंदरसिंग पंढेर अनेक वर्ष तुरुंगात होता. कोलीला 20 ऑक्टोबर 2023 रोजी तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. 2006मध्ये अटकेवेळी कोली 30 वर्षाचा होता. त्याला वेगवेगळ्या प्रकरणात अनेकवेळा मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us