Nitin Gadkari : तिसरं महायुद्ध कधीही पेटू शकतं.. नितीन गडकरींच्या इशाऱ्याने खळबळ

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच महायुद्ध आणि भारतातील संपत्तीच्या विकेंद्रीकरणाबद्दल मोठे विधान केले आहे. महासत्तांच्या हुकूमशाही आणि निरंकुशता यामुळे समन्वय, परस्पर सौहार्द आणि प्रेम संपत चालले आहे आणि जगभरात संघर्षाचे वातावरण आहे असे गडकरी म्हणाले. भारतात गरिबांची संख्या वेगाने वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केलं.

Nitin Gadkari : तिसरं महायुद्ध कधीही पेटू शकतं.. नितीन गडकरींच्या इशाऱ्याने खळबळ
नितीन गडकरी
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 07, 2025 | 10:46 AM

Nitin Gadkari : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि तशाचा विधानांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच जागतिक युद्धाबद्दल एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की जगात सुसंवाद, प्रेम आणि शांती कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगात कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. काही महासत्तांची हुकूमशाही हे यामागील कारण असल्याचंही गडकरी म्हणाले.

रविवारी ( 6 जुलै) नागपूरमध्ये ‘बियॉन्ड बॉर्डर्स’ नावाच्या एका पुस्चकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते. भारत ही भगवान बुद्धांची भूमी आहे, जी सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देते. त्यामुळे जगात घडणाऱ्या घटनांकडे पाहून आपण भविष्यातील धोरणांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. युद्धांमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कधीही महायुद्ध सुरू होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

मानवी वस्त्यांवर होतोय मिसाईल हल्ला

आजची युद्धं तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत झाली आहेत आणि त्यामुळे मानवतेचे रक्षण करणे कठीण होत आहे असे ते म्हणाले. एवढचं नव्हे तर या मुद्यावरून त्यांनी चिंताही व्यक्त केली. टँक आणि लढाऊ विमानांसारख्या शस्त्रांचे महत्त्व खूपच कमी झाले आहे आणि आता क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सारख्या शस्त्रांचा वापर जास्त होत आहे. दुर्दैवाने, आता मानवी वस्त्यांवरही क्षेपणास्त्रे टाकली जात आहेत, अशा काळात परिस्थिती अतिशय कठीण होत चालली असल्याचे त्यांनी नमूद केलं.

महाशक्तींची हुकूमशाही

‘आपण सर्वजण हळूहळू विनाशाकडे वाटचाल करत आहोत. महासत्तांच्या हुकूमशाही आणि राजवटीमुळे जगात संवाद, प्रेम आणि सौहार्द संपत चालले आहे.’ असे गडकरी म्हणाले. या मुद्द्यांवर जगभरात चर्चा झाली पाहिजे आणि वेळेवर पावले उचलण्याची गरज असल्याचे मतही गडकरींनी व्यक्त केलं.

भारतात गरीबांची संख्या वाढत्ये

याच संदर्भात बोलताना , त्यांनी भारतातील परिस्थितीवर चर्चा केली. आपल्या देशात समृद्धीचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक झाल्याचे गडकरींनी सांगितलं. कारण देशात गरीब वाढत चालले आहेत आणि काही श्रीमंतांच्या हातात संपत्ती वाढत चालली आहे. अर्थव्यवस्थेचं केंद्रीकरण होता कामा नये. संपत्तीचं विकेंद्रीकरण व्हायला हवं असं म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी शेती, उद्योग, कर व्यवस्था आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) यासारख्या विषयांवरही भाष्य केले. ‘ज्याचं पोट रिकामं आहे त्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही’ असेही गडकरी म्हणाले.