
राजधानी नवी दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि पाच वेळा आमदार राहिलेले नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नितीन नबीन यांच्यासाठी 37 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. उद्या, मंगळवारी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. नितीन नबीन हे जेपी नड्डा यांची जागा घेणार आहेत. नितीन नबीन हे कोण आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी सांगितले की, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नियमांनुसार, 36 पैकी 30 राज्यांमध्ये राज्याध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होते. हा आकडा आवश्यक 50% पेक्षा जास्त आहे. या निवडणुकीसाठी 16 जानेवारी 2026 रोजी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली होती. सोमवारी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ एकूण 37 नामांकन अर्ज सादर करण्यात आले. सर्व नामांकन अर्जांची तपासणी करण्यात आली. हे सर्व अर्ज वैध असल्याचे पहायला मिळाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर, निवडणूक अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदासाठी फक्त एकच उमेदवार म्हणजे नितीन नबीन हे असल्याचे जाहीर केले. याचाच अर्थ नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांनी 14 डिसेंबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. 45 वर्षीय नबीन हे पाटण्यातील बांकीपूर येथून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांना सरकार आणि संघटनेतील कामाचा मोठा अनुभव आहे. नितीन नबीन हे भाजप नेते नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत. नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे बिहार सरकारमध्ये मंत्री होते. तसेच त्यांनी छत्तीसगड भाजपचे प्रभारी म्हणूनही काम केले आहे.
भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा जन्म 23 मे 1980 रोजी रांची येथे झाला. त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे राजकारणात चांगले वजन होते. ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. वडिलांच्या निधनानंतर नितीन यांनी राजकारणात आले. 2006 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी 2010, 2015, 2020 आणि 2025 मध्ये ते सलग 5 वेळा विजय मिळवला. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव अशी पदे देखील भूषवली आहेत. आता त्यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.