Amit Shah: पंतप्रधान मोदींना बदनाम करून सत्तेची आकांक्षा पूर्ण होणार नाही; राहुल गांधींवर अमित शाहांची घणाघाती टीका

Amit Shah Takes Dig at Rahul Gandhi: अमित शाहांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भारताला बदनाम करून सत्ता मिळणार नाही, असं म्हणत राहुल गांधींना थेट सल्ला दिला आहे.

Amit Shah: पंतप्रधान मोदींना बदनाम करून सत्तेची आकांक्षा पूर्ण होणार नाही; राहुल गांधींवर अमित शाहांची घणाघाती टीका
Amit Shah Announces Nationwide Cooperative Initiative
| Updated on: Nov 15, 2026 | 6:17 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या विकासाचा मुद्दा मांडतानाच काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. सहकाराची सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीतूनच सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 वर्षांनंतर केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली, असे शाह म्हणाले. यावेळी त्यांनी साखर कारखाने, डेअरी उद्योग आणि सहकार क्षेत्रातील औद्योगिक विकासाबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्र ही देशात सहकार चळवळीची सुरुवात करणारी भूमी आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या विकासाची सुरुवातही पुण्यातून होत असल्याचे अमित शाह यांनी नमूद केले. काँग्रेसच्या काळात शेतकरी केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालयाची मागणी करत होते. मात्र त्यांची मागणी मान्य झाली नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून सहकार क्षेत्राला स्वतंत्र व्यासपीठ दिले, असा दावा त्यांनी केला.

Loading...

ते म्हणाले की, काँग्रेसच्या काळात अनेक साखर कारखाने बंद पडले. आता हे कारखाने पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे शाह यांनी सांगितले. सुमारे 110 एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या कारखान्याच्या माध्यमातून डेअरी आणि साखर कारखान्यांसाठी लागणारी यंत्रसामग्री देशातच तयार केली जाणार आहे. हा प्रकल्प 2029 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे कंटेनरही येथे तयार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अमित शाह यांनी भारत टॅक्सीचा मुद्दाही उपस्थित केला. देशभरात भारत टॅक्सी सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. खासगी टॅक्सी कंपन्यांकडून चालकांचे शोषण होत असल्याचा आरोप करत सहकाराच्या माध्यमातून चालकांना अधिक सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील कार्यक्रमात भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ आणि सहकारी संस्थांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उद्घाटनही नियोजित होते.

यानंतर अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसला तीन वेळा पराभवाला सामोरे जावे लागल्याने पक्षाकडून सरकारवर टीका केली जात असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारतविरोधी विचार मांडले आणि देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शाह यांनी केला. काँग्रेसच्या काळात मोठमोठे घोटाळे झाले, मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या काळात चार आण्याचाही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक करू शकले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधी यांना सल्ला देताना शाह म्हणाले, भारताला बदनाम करून सत्ता मिळणार नाही. विदेशी दौरे बंद करून गावागावात फिरा, तर कधीतरी तुमचा नंबर लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताची प्रतिमा खराब करून सत्तेची आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आपण निषेध करतो, असे अमित शाह म्हणाले. अशा प्रकारे पुण्यातील कार्यक्रमात सहकार क्षेत्राच्या विकासाचा रोडमॅप मांडतानाच अमित शाह यांनी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवरही टीका केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us