NDA मध्ये कोणाची एन्ट्री होणार? मंत्रीपदाचा निर्णय कोण घेणार? उदय सामंतांनी थेट दिल्लीकडे बोट दाखवलं, म्हणाले…
Uday Samant Statement: महेंद्र दळवींची जीभ अनावधानाने घसरली असावी. त्यांना एकनाथ शिंदेंनी योग्य समज दिली असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

महायुतीतील राजकीय वातावरण आणि शिवसेना-राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदांच्या चर्चेदरम्यान मंत्री उदय सामंत यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. महेंद्र दळवी यांची जीभ अनावधानाने घसरली असावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना योग्य समज दिली आहे. माझेही त्यांच्याशी बोलणे झाले आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, आपण महायुतीमध्ये आहोत, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. सध्या निर्माण झालेली दरी भरून काढणे गरजेचे आहे. दोन्ही आमदारांशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी काही वेळा अशी वक्तव्ये केली जातात. मात्र महायुती म्हणून आपल्याला एकत्रितपणे काम करायचे आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच सुनील तटकरे खासदार झाले, असेही सामंत म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य पक्षप्रवेशावरून चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरवरही उदय सामंत यांनी भाष्य केले. साडेचार वर्षांपासून आम्ही हेच ऐकत आहोत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनली आहे. मी संजय राऊत यांच्याकडे होतो, तेव्हा उदय सामंत चांगला होता. आता मात्र माझी पत्रकार परिषदही त्यांनी ऐकली नाही, असा टोला सामंत यांनी लगावला.
ऑपरेशन कधी होणार, याची तारीख आणि वार सर्वांना समजेल, असे मी आधीच सांगितले होते. ऑपरेशन टायगर हे नावही तुम्हीच दिले आहे, असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सामंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकारण वेगळे असले तरी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. राऊत आजारी असताना आमच्या नेत्यांनी त्यांच्या भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस केली होती. ते आजारातून बरे झाले आहेत. आता त्यांनी असेच निरोगी राहावे, अशी सदिच्छाही सामंत यांनी व्यक्त केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या मतदारसंघ पुनर्रचना विषयावर बोलताना, याबाबत विचार करायचा की नाही, हे केंद्र सरकार ठरवेल, असे सामंत म्हणाले. दृष्टिकोन कोणताही असला तरी अंतिम निर्णय दिल्लीमध्येच होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच एनडीएमध्ये कोणाचा समावेश होणार किंवा कोणाला मंत्रिपद मिळणार, हे दिल्लीतील नेतृत्वाच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत विचारले असता, विलीनीकरण झाले आहे का, असे म्हणत त्यांनी या चर्चेला फारसे महत्त्व दिले नाही. या सगळ्या गोष्टी जर-तरवर आधारित आहेत. त्याचा एकनाथ शिंदे यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. केंद्रातील महायुतीमध्ये शिवसेना हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
