NSA Ajit Doval : त्यावेळी वाटलं करिअर संपलं, डोवाल यांनी सांगितला 50 वर्षापूर्वीचा चिनी मिशनचा किस्सा, शेरपाने शिकवला आयुष्यातला महत्वाचा धडा

NSA Ajit Doval : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज 50 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला. त्यावेळी त्यांनी एक टीम मिशनवर पाठवली होती.एका वयोवृद्ध शेरपाने त्या काळात एक महत्वाचा धडा दिल्याची आठवण आज अजित डोवाल यांनी सांगितली.

NSA Ajit Doval : त्यावेळी वाटलं करिअर संपलं, डोवाल यांनी सांगितला 50 वर्षापूर्वीचा चिनी मिशनचा किस्सा, शेरपाने शिकवला आयुष्यातला महत्वाचा धडा
Ajit Doval
| Updated on: Sep 19, 2026 | 3:38 PM

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आयआयटी रुडकीच्या दीक्षांत सोहळ्यात आपल्या आयुष्यातील एक कठीण किस्सा सांगितला. सिक्कीममध्ये तैनातीच्यावेळी त्यांनी पाठवलेली एक टीम चीनच्या जाळ्यात अडकली होती. त्यावेळी डोवाल यांना आपलं करिअर संपलं असं वाटू लागलं. पण चौकशीत ते निरपराध ठरले. कारण नकाशामध्ये चूका होत्या. त्याचवेळी एका शेरपा साथीदाराने त्यांना आयुष्यातील एक चांगला धडा दिला. डोवाल यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली, त्यावेळी ते युवा आयपीएस अधिकारी होते आणि गुप्तचर क्षेत्रात नवीन होते. सिक्कीसाठी त्यांना गुप्तचर प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेलं. त्यावेळी सिक्कीम भारताचा अधिकृत भाग नव्हता. भारतामध्ये समावेशाची प्रक्रिया सुरु होती. डोवाल या प्रक्रियेचा भाग होते. सीमावर्ती भागावर आणि चीनच्या हालचालींवर लक्ष ठेऊन गोपनीय माहिती मिळवण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती.

एकदा सीमावर्ती भागात गुप्तचर मिशन राबवण्यात आलं. त्यात असलेल्या सैनिकांना आठ दिवसात परतायचं होतं. पाच, दहा आणि कदाचित 15 दिवस निघून गेले. तरी सैनिक माघारी आले नाहीत. डोवाल यांची चिंता वाढली. लोक जिवंत आहेत की नाही हे माहित नव्हतं, हिमस्खलन झाल्याची कुठली बातमी नव्हती. मुख्यालयातून फोन करुन बॉसने विचारलं की, तुम्ही सीमेपलीकडे काही लोकांना पाठवलय का?. डोवाल यांनी उत्तर दिलं की, माहित नाही, पाच-सहादिवसात टीम परतायला पाहिजे होती. आता दहा-अकरा दिवस होत आले. बॉसने सांगितलं की, ते चीनच्या ताब्यात आहेत. चीनने या टीमची चौकशी केली व त्यांना सोडून दिलं. ते परत आले, तेव्हा पूर्णपणे कोसळलेले होते.

एका वयोवृद्ध शेरपा त्यांच्यासोबत होता

चौकशी सुरु झाल्यानंतर डोवाल यांना वाटलं की, आपलं करिअर आता संपलं. नव्याने करिअर सुरु करावं लागेल. चौकशीत ते दोषी आढळले नाहीत. कदाचित त्यांनी सर्व बरोबर केलं होतं. कारण मुख्यालयातून मिळालेले स्केच आणि नकाक्षामध्ये कमतरता होत्या. डोवाल त्यावेळी खूप दु:खी होते. आयुष्यातील तो निराशाजनक काळ असल्याचं डोवाल यांनी सांगितलं.

इंटेलिजेंस ब्यूरोमधील एका वयोवृद्ध शेरपा त्यांच्यासोबत काम करत होता. त्याने विचारलं की, सर तु्म्ही इतके दु:खी का आहात?. डोवाल त्याला म्हणाले की, मोठ्या अपेक्षेने करिअर निवडलेलं. पण सगळं चुकलं. शेरपा त्यांना म्हणाला, असं काही नाहीय. हा सर्व मॅप रिडिंगचा प्रकार आहे. आयुष्य फक्त एक प्रश्न आहे, काही नकाशा बरोबर वाचतात, काही चुकीचे. त्याने अनेक वर्ष बर्फाळ प्रदेशात काढली होती. त्याने तीन गोष्टी सांगितल्या. पहिलं म्हणजे तुम्ही कुठे आहात, तुम्हाला कुठे जायचय, तिसरा तिथे पोहोचण्याचा मार्ग.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us