
लोकसभेसोबतच ओडिशा विधानसभेच्या निवडणुकीचे निकालही हाती येत आहेत. राज्यात 147 जागांसाठी मतदान पार पडले होते. या सर्वच्या सर्व जागांचे कल हाती आले आहेत. या कलांमध्ये मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. नवीन पटनायक यांची राज्यातून सत्ता जाताना दिसत आहे. तब्बल 24 वर्षानंतर नवीन पटनायक यांची राज्यातून सत्ता जात आहे. तर, ओडिशामध्ये भाजपची सत्ता येताना दिसत आहे. ओडिशातील 21 जागांपैकी 19 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर बीजेडी केवळ एकाच जागेवर आघाडीवर आहे. काँग्रेसही फक्त एका जागेवर आघाडीवर आहे.
ताज्या माहितीनुसार, भाजपने 74 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला उत्तर ओडिशात सर्वाधिक यश मिळताना दिसत आहे. ओडिशाच्या बारगड, कालाहाडी, बालंगीर, पुरी, संभळपूर आणि क्योंझर या भागात बीजेडीला मोठं यश मिळताना दिसत आहे. ओडिशात सरकार बनवण्यासाठी 74 जागांची गरज आहे. हा आकडा भाजप पार पाडताना दिसत आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीत बीजेडीला 113 जागा मिळाल्या होत्या. तर 23 जागा जिंकून भाजप मुख्य विरोधी पक्ष बनला होता. मात्र, आता 24 वर्षानंतर नवीन पटनायक यांना सत्तेतून बाहेर व्हावं लागणार आहे. भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी बीजेडीला मात्र फक्त 57 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर काँग्रेसचे 13 उमेदवार आघाडीवर आहेत. सीपीएमला एक जागा मिळताना दिसत असून दोन अपक्षही आघाडीवर आहेत.
आलेल्या कलावरून भाजप राज्यात पहिल्यांदाच सरकार बनवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशात अत्यंत आक्रमक प्रचार केला होता. राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं मोदी प्रचार सभांमध्ये सांगत होते. सध्याचे कल पाहता मोदी यांचं म्हणणं खरं झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
नवीन पटनायक एकेकाळी एनडीएचा भाग होते. 2009 नंतर ते एनडीएपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी ओडिशात आपल्या बळावर सत्ता आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही त्यांनी ओडिशात सत्ता आणली होती. या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. पण जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.