अशा राक्षसांचा..; पहलगाममध्ये जीव गमावलेल्या शुभम द्विवेदीच्या वडिलांची ‘ऑपरेशन सिंदूर’वर पहिली प्रतिक्रिया

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदीच्या वडिलांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळाली असेल, असं ते म्हणाले.

अशा राक्षसांचा..; पहलगाममध्ये जीव गमावलेल्या शुभम द्विवेदीच्या वडिलांची ऑपरेशन सिंदूरवर पहिली प्रतिक्रिया
शुभम द्विवेदी, त्याची पत्नी एशान्या आणि त्याचे वडील
Image Credit source: ANI
| Updated on: May 07, 2025 | 8:36 AM

पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड घेतला. पहलगाम हल्ल्यात कानपूर इथला 31 वर्षीय व्यापारी शुभम द्विवेदी यानेसुद्धा आपले प्राण गमावले होते. पत्नी आणि 11 सदस्यांच्या फॅमिली ग्रुपसोबत तो काश्मीरला फिरायला गेला होता. शुभमचं लग्न दोन महिन्यांपूर्वी 12 फेब्रुवारी रोजी एशान्या द्विवेदीशी झालं होतं. आता शुभमचे वडील संजय द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या ऑपरेशननंतर शुभमच्या आत्म्याला शांती मिळाली असेल, असं ते म्हणाले.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना संजय द्विवेदी म्हणाले, “मी भारतीय सैन्याला सलाम करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, ज्यांनी देशातील जनतेच्या वेदना ऐकल्या. ही बातमी ऐकल्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांचं मन हलकं झालं. आमचं दु:ख थोडंफार कमी झालं. आज शुभमच्या आत्म्याला खरोखरंच शांती मिळाली असेल असं मला वाटतं. आज त्याचं बलिदान व्यर्थ गेलं नाही.”

“मी तिन्ही सैन्य दलांना पुन्हा पुन्हा सलाम करतो. मला आशा आहे की भविष्यातही जर पाकिस्तानने कोणतंही चुकीचं कृत्य करण्याचा प्रयत्न केला, तर आपण ते नष्ट करू आणि दहशतवादाचा नायनाट करू. या घटनेनंतर कुठेतरी सैन्याबद्दलचा विश्वास अधिक वाढला आहे. अशा राक्षसांचा अशा प्रकारे नाश करूनच दहशतवादावर नियंत्रण मिळवता येईल. कारण जी भाषा त्यांना समजते, त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. आज आपण त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं आहे”, असं ते पुढे म्हणाले.

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी शुभमला कुराणमधील कलमा बोलून दाखवण्यास सांगितलं. शुभमला ते म्हणता न आल्याने अतिरेक्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. “शुभम आणि एशान्या हे घोडेस्वारी करत परिसरात फिरत होते, तेव्हाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. सैन्याच्या वेशात असलेल्या एका अतिरेक्याने शुभमला विचारलं की, तू मुस्लीम आहे का? तर दुसऱ्याने त्याला कलमा म्हटल्यास सांगितलं. त्यावर शुभमने कलमा येत नसल्याचं सांगताच त्याला गोळी झाडली”, अशी माहिती शुभमचा चुलत भाऊ सौरभने दिली होती.