11 वर्षानंतर पहिल्यांदाच देशातील 300 खासदार एकवटले, निवडणूक आयोगाच्या विरोधात एल्गार; संसदेपासून मोर्चाला सुरुवात

'एसआयआर' आणि 'मतचोरीच्या' आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला आहे. यामध्ये काँग्रेस, सपा, आप, द्रमुक यासह अनेक पक्षांनी यात भाग घेतला आहे. इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलकही लावण्यात आले आहेत.

11 वर्षानंतर पहिल्यांदाच देशातील 300 खासदार एकवटले, निवडणूक आयोगाच्या विरोधात एल्गार; संसदेपासून मोर्चाला सुरुवात
निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चाला सुरुवात
| Updated on: Aug 11, 2025 | 12:36 PM

सध्या देशात मत चोरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील अनियमिततेबद्दल गंभीर आरोप केले होते. ‘एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला आहे. इंडिया आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला असून त्यामध्ये विरोधी पक्षाचे 300 हून अधिक खासदार सहभागी झाले असून संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला असून काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडली.

मात्र दिल्ली पोलिसांनी खासदारांच्या निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. बॅरिकेड्स उभारून मोर्चा थांबवण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलकही लावण्यात आले आहेत. संसदेपासून काही अतंरावरच हा मोर्चा अडवण्यात आला असून शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक खासदार तिथेच ठिय्या देऊन बसले आहेत.

 

तत्पूर्वी, आज निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या 30 सदस्यीय शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले. निवडणूक आयोगाने दुपारी 12 वाजता 30 जणांना भेटण्यासाठी बोलावले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी 12:00 वाजता चर्चेसाठी वेळ दिला. जागेच्या कमतरतेमुळे, कृपया जास्तीत जास्त 30व्यक्तींची नावे द्या असे सांगण्यात आलं.

मात्र गेलो तर आम्ही सर्वजण निवडणूक आयोगाकडे जातील किंवा कोणीही जाणार नाही. आम्ही शिष्टमंडळाला भेटण्यासाठी नाही तर एकत्रितपणे निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला होता, असं विरोधकांचं म्हणण आहे.

मतदार यादीवरून वाद सुरूच

मतदार यादीतील अनियमिततेवरून, घोटाळ्यावरून लढाई सुरूच आहे. राहुल गांधींसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी कालपासूनच याबाबत मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइट देखील लाँच केली. तसेच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केलं.

अनेक खासदार बॅरिकेड्सवर चढले आणि ते ओलांडून उड्या मारल्या, त्यात अखिलेश यादव यांचाही समावेश होता. तर टीएमसी खासदार सागरिका घोष आणि महुआ मोईत्रा याही बॅरिकेड्सवर चढल्या. त्यानंतर अखिलेश यादवर हे ठिय्या देऊन बसले.  तर निवडणूक आयोगाकडे फक्त 30 खासदार नाही तर आम्ही सर्व जाणार असं जयराम रमेश यांनी सांगितलं. पोलिसांनी जाऊ दिं तर आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊ, पण ते आम्हाला जाऊच देत नाहीयेत असं अखिलेश यादव म्हणाले.