डोंगर, धुकं आणि वळणावळणाचा रेल्वेमार्ग… वंदे भारतचा ‘ऑरेंज स्नेक’ अवताराचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका!

डोंगरदऱ्या, घनदाट जंगलं आणि धुक्याने वेढलेला रेल्वेमार्ग... या निसर्गरम्य परिसरातून भगव्या-पांढऱ्या रंगाची वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या ट्रेनला ऑरेंज स्नेक का म्हटलं जातंय? व्हिडिओ पाहा मग उत्तर मिळेल.

डोंगर, धुकं आणि वळणावळणाचा रेल्वेमार्ग... वंदे भारतचा ऑरेंज स्नेक अवताराचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका!
orange snake train name vande bharat
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 11:12 PM

भारतीय रेल्वेच्या एका नव्या रेल्वेमार्गाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हिरवीगार जंगलं, उंचच उंच डोंगर, धुक्याने वेढलेल्या दऱ्या आणि त्यातून सुसाट धावणारी भगव्या-पांढऱ्या रंगाची वंदे भारत एक्स्प्रेस… हे दृश्य पाहून अनेकांना आपण भारतात नसून परदेशातील एखाद्या निसर्गरम्य भागात आहोत, असा भास होतो. या ट्रेनला सोशल मीडियावर ‘ऑरेंज स्नेक’ असं नाव दिलं जात आहे. सापासारखी वळणं घेत डोंगररांगांमधून जाणाऱ्या या ट्रेनचा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, हा सुंदर रेल्वेमार्ग दक्षिण भारतातील कर्नाटकच्या पश्चिम घाटातून जातो. बेंगळुरू ते गोवा या प्रवासात प्रवाशांना निसर्गाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.

काय आहे ऑरेंज स्नेक? कुठून जाणार ही ट्रेन?

‘ऑरेंज स्नेक’ हे नाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या भगव्या-पांढऱ्या रंगावरून आणि डोंगरांमधून वळणं घेत जाणाऱ्या तिच्या दृश्यावरून पडलं आहे. कर्नाटकातील सकलेशपूर ते सुब्रमण्यम रोडदरम्यानच्या शिराडी घाट परिसरातून ही ट्रेन धावणार आहे. पश्चिम घाटातील घनदाट जंगलं, उंच डोंगर आणि वळणावळणाच्या रेल्वेमार्गातून जाणारी ही ट्रेन पाहणं हा एक वेगळाच अनुभव असणार आहे. यापूर्वी या मार्गावर वंदे भारतची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे या मार्गाची चर्चा सुरू झाली.

Loading...

57 बोगदे आणि 258 पुलांचा थरार

या रेल्वेमार्गाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची रचना. साधारण 55 किलोमीटरच्या घाट विभागात तब्बल 57 बोगदे आणि 258 पूल आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना निसर्गासोबतच भारतीय रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याचीही झलक पाहायला मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवीगार झाडं आणि त्यातून जाणारी भगव्या रंगाची ट्रेन हे दृश्य पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतं.

बेंगळुरू ते गोवा वंदे भारतचा प्रवास

या मार्गावर यशवंतपूर ते मडगावदरम्यान वंदे भारत चेअर कार एक्स्प्रेस चालवण्याची योजना आहे. ही आठ डब्यांची ट्रेन असेल. यात एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार अशा दोन्ही प्रकारच्या आसनांची सुविधा असेल. ही सेवा मंगळुरू जंक्शनमार्गे गोव्यातील मडगावपर्यंत जाणार आहे. सध्या मंगळुरू सेंट्रल ते मडगावदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सेवेचा विस्तार म्हणूनही या मार्गाकडे पाहिले जात आहे.

 

 

 

सहा दिवस धावणार, अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा

प्रस्तावित वेळापत्रकानुसार ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार असून बुधवारी यशवंतपूरहून आणि गुरुवारी मडगावहून सुटणार नाही. यशवंतपूरहून सकाळी 7.35 वाजता, तर मडगावहून सकाळी 8.20 वाजता ट्रेन सुटण्याचे नियोजन आहे. या प्रवासासाठी साधारण 12 तास 55 मिनिटे ते 13 तास 20 मिनिटांचा कालावधी प्रस्तावित आहे.

या मार्गावर हासन, सकलेशपूर, सुब्रमण्यम रोड, मंगळुरू जंक्शन, उडुपी, कुंदापूर, मुरुडेश्वर, गोकर्ण रोड आणि कारवार यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असतील. त्यामुळे बेंगळुरू ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वंदे भारतचा फायदा होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us