
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र तरी देखील चीन पाकिस्तानची बाजू घेताना दिसत आहे, चीन पाकिस्तानला समर्थन देत आहे, मात्र आता चीनच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. अमेरिकेच्या व्यापार युद्धात चीन पूर्णपणे फसला आहे. ज्यावेळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग पाकिस्तानची चिंता करत होते, तेव्हा भारतानं मोठा खेळ खेळला आहे. त्यामुळे चीन संकटात सापडला आहे.
अमेरिकेचे आर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सोमवारी म्हटलं आहे की, अमेरिकेच्या टॅरीफला टाळण्यासाठी अनेक देशांनी खूप चांगले प्रस्ताव दिले आहेत. मात्र आमचा सर्वात आधी करार हा भारतासोबत होऊ शकतो. स्कॉट बेसेंट यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं की, माझा असा अंदाज आहे की, अमेरिकेचा पहिला व्यापारी करार हा भारतासोबतच होऊ शकतो. स्कॉट बेसेंटचं हे वक्तव्य चीनच्या टेन्शनमध्ये वाढ करणारं आहे. कारण अमेरिकेकडून चीनवर प्रचंड टेरीफ लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनं भारतासोबत करार केल्यास चीनच्या भारतातील बाजारपेठेला मोठा फटका बसू शकतो.
स्कॉट यांनी नेमकं काय म्हटलं?
अमेरिकेच्या टॅरीफला टाळण्यासाठी अनेक देशांनी खूप चांगले प्रस्ताव दिले आहेत. आमचं जपानसोबत देखील बोलणं सुरू आहे. आशियातील इतर अनेक देशांसोबत आमची चर्चा सुरू आहे.मात्र माझा असा अंदाज आहे, आमचा पहिला व्यापारी करार हा भारतासोबत होऊ शकतो. याच आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती वेंस हे गेल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर होते, दोन्ही बाजुंनी सकारात्मक बोलणं झालं असं स्कॉट यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आमच्या या निर्णयानंतर आता चीनने अमेरिकेच्या उत्पन्नावरील टॅरीफ कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. मला असं वाटतं की चीन हा निर्णय घेऊन स्वत:ला वाचवत आहेत, एक दिवस ते नक्कीच स्वत:हून आमच्याकडे येतील, असं स्कॉट यांनी म्हटलं आहे.