
पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या कित्येक जोडप्यांना, कित्येक कुटुंबाला हे माहितही नसेल की आपल्यासोबत काय होणार आहे. पर्यटनाचं सुंदर स्वप्न पाहून आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण हे काही क्षणातच उधवस्त होतील याची साधी कल्पनाही नसेल.अशाच एका घटनेनं हादरवून सोडलं ती म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ला.
भ्याड हल्ल्याबद्दल पाकिस्तानचा सर्वत्र निषेध
पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. या हल्ल्यात कित्येक निष्पाप लोकांचा जीव गेला. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याबद्दल पाकिस्तानचा सर्वत्र निषेध केला जात आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्याची ही अशी पहिलीच वेळ आहे. या पहलगाम दहशतवादी हल्याच सुमारे जवळपास 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, तसेच परदेशातूनही बरेच पर्यटक आले होते.
कर्नाटकातील मंजुनाथ राव यांचा हल्ल्यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
या हल्ल्याचे हृदय हेलावून टाकणारे अनेक व्हिडीओ, फोटो समोर येत आहेत. यातीलच एक व्हिडीओ म्हणजे कर्नाटकातील मंजुनाथ राव यांचा शेवटचा व्हिडीओ. या हल्ल्यात त्यांचाही मृत्यू झाला आहे. ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी पत्नी आणि मुलांसह काश्मीरमध्ये आले होते. सध्या त्याचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहेत की, या टूरमुळे पती-पत्नी किती आनंदी आहेत. त्याच वेळी, त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या मेहुण्याकडून एक निवेदन देखील देण्यात आले आहे.
व्हिडीओमध्ये मंजुनाथ यांच्या ट्रीपचे शेवटचे क्षण
मंजुनाथ राव हे तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलांसह जम्मू-काश्मीरला आले होते. ते शिवमोगा येथील रिअल इस्टेट व्यावसायिक होते. त्यांच्या पत्नीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे शेवटचे क्षण म्हणजे काश्मीर ट्रीपचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे. पण या आनंदावर कायमच विरझन पडणार आहे, कुटुंबावर मोठं संकट कोसळणार अशी कुठेही त्यांना कल्पना नसेल.
“कोणीतरी माझ्या पतीला दुरून गोळी मारली”
दरम्यान एका माध्यमाशी बोलताना मंजुनाथ राव यांच्या पत्नी पल्लवी म्हणाल्या की, त्या आणि त्यांचा मुलगा ठीक आहेत, पण तिने तिच्या डोळ्यासमोर तिचा पती गमावला. त्या म्हणाल्या की,”कोणीतरी माझ्या पतीला दुरून गोळी मारली. मी आणि माझा मुलगा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा ते आधीच दगावले होते”
‘मी दहशतवाद्यावर ओरडले’
ती पुढे म्हणाली, ‘मी दहशतवाद्यावर ओरडले आणि म्हणाले की तू माझ्या पतीला मारलं आहेस, मलाही मार. माझ्या मुलानेही तेच म्हटलं… पण तो दहशतवादी तिथून निघून गेला.” हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते बीवाय राघवेंद्र आणि तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मंजुनाथ राव यांचे मेहुणे अश्विन यांनी त्यांच्याबद्दल सांगितले. ते म्हणाले की, ‘मंजुनाथ खूप चांगला माणूस होता, तो स्वभावाने मैत्रीपूर्ण होता आणि त्याच्यात नेतृत्वगुण होते. घटना काहीही असो, जर कोणाला मदतीची गरज असेल तर मंजुनाथ सर्वात आधी पुढे येत असे. माझ्या एका मित्राला एकदा आरोग्याचा त्रास झाला होता, मंजुनाथने डॉक्टरांशी बोलून मदत केली. माझ्यासाठी, सर्वांसाठी, तो नेहमीच तिथे होता. तो एक चांगला माणूस होता. तो नेहमीच इतरांचे भले इच्छित असे. त्याच्यासोबत हे घडले यावर आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही”
मंजुनाथ यांना आईने सांगितलं होतं जाऊ नको
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले मंजुनाथची आई म्हणाली, ‘काल, जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली, तेव्हा आम्ही टीव्ही पाहत होतो. अनेक नेते आम्हाला भेटले आहेत. मंजुनाथ शुक्रवारी गेला होता. मी त्याला तिथे जाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण त्याने मला पटवून दिलं आणि काश्मीरला गेला. त्याने परवा मला फोन केला. तो म्हणाला की तो टूरसाठी एका दुर्गम भागात जात आहे पण गेल्या दोन दिवसांपासून त्याने आम्हाला फोनही केला नव्हता.” असं म्हणत त्यांच्या आईने मुलगा गमावल्याचा शोक व्यक्त केला आहे.