‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखलं जातं बैसरन; लोकप्रिय पर्यटनस्थळालाच अतिरेक्यांनी केलं लक्ष्य

पहलगाममधील बैसरन याठिकाणी मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. काश्मीरमधील पहलगाम हे पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे.

मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं बैसरन; लोकप्रिय पर्यटनस्थळालाच अतिरेक्यांनी केलं लक्ष्य
Pahalgam
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 23, 2025 | 12:25 PM

दक्षिण काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोरं हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखलं जातं. ज्याठिकाणी पर्यटक निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी, आल्हाददायक वातावरणात फिरण्यासाठी येतात, त्याठिकाणी मंगळवारी दुपारी रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आणि टाहो फोडणारे त्यांचे नातेवाईक.. हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पहायला मिळालं. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधून गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं. तिथं जाण्यासाठी अरुंद वाट असल्याने पर्यटकांना आडोशाला जाण्याची संधी मिळाही नाही. रक्ताच्या थारोळ्यात पर्यटकांचे आप्त मदतीसाठी धावा करत होते. काही स्थानिकांनी जखमींना पाठीवरून रुग्णालयात नेलं. बैसरन खोऱ्याच चालत किंवा खेचरावरून जाता येतं. त्यामुळे जखमींच्या मदतीसाठी प्रशासनाला हेलिकॉप्टर आणावे लागले. या घटनेनंतर पहलगाममधील रस्त्यांवर शुकशुकाट होता.

पहलगाम कशासाठी प्रसिद्ध?

पहलगाम हे जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे. ते काश्मीर खोऱ्याच्या दक्षिणेला आहे.
पहलगाम हे जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे, जे काश्मीर खोऱ्याच्या दक्षिणेला आहे. श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे सुमारे 90 किलोमीटर अंतरावर आहे. पहलगामच्या लिद्दर नदीकाठी असलेले पर्वतीय मार्ग आणि घनदाट जंगलं हे ‘मेंडपाळांचं खोरं’ म्हणूनही ओळखलं जातं. अरु वन्यजीव अभयारण्य, तपकिरी अस्वल, कस्तुरी मृग यांसारख्या प्राण्याचं घर, अभिनेता सनी देओलच्या चित्रपटावरून नाव मिळालेली निसर्गरम्य ‘बेताब व्हॅली’ आणि तुलियन तलाव ही पहलगाममधील लोकप्रिय ठिकाणं आहेत. बैसरन हे पहलगाममधील अत्यंत निसर्गरम्य कुरण आहे. हे ठिकाण पर्यटकांना मोठ्या संख्येनं आकर्षित करतं.

बैसरन कुठे आहे?

पहलगामपासून पाच किलोमीटर अंतरावर बैसरन खोरं आहे. या परिसरातील हे सर्वांत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. याठिकाणी फक्त पायी किंवा खेचरावरूनच जाता येतं. त्यामुळे मंगळवारी जेव्हा दहशतवाद्यांनी याठिकाणी पर्यटकांवर हल्ला केला तेव्हा परिसरात जवळपास कोणतंच वाहन नव्हतं.

बैसरन हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणूनही ओळखलं जातं. इथे चहूबाजूला देवदारची जंगलं आणि बर्फाची चादर असलेल्या पर्वतरांगा पहायला मिळतात. तुलियन तलावाला भेट देणारे ट्रेकर्स याठिकाणी कॅम्पिंगसुद्धा करतात. जम्मू-काश्मीरच्या पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे पर्यटनस्थळ उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही लोकप्रिय आहे.