Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT) वरिष्ठ कमांडर सैफुल्लाह कसुरी ऊर्फ खालिद असल्याचं कळतंय.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. या घटनेच्या काही तासांतच पाकिस्तानने त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नकार देतो”, असं पाकिस्तानने स्पष्ट केलंय. पहलगाममधील दहशवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले. इतकंच नव्हे तर “हा हल्ला भारतातील केंद्र सरकारच्या विरोधात होता. मणिपूर, नागालँडपासून काश्मीरपर्यंत अशांतता असून या हल्ल्याला देशातील परिस्थितीच जबाबदार आहे”, अशी टीका त्यांनी केली.
“भारतातील केंद्र सरकारला नागालँड, मणिपूर, काश्मीर आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये निषेधांचा सामना करावा लागतोय. सरकार अनेकांचं शोषण करत असल्याने याला देशातील परिस्थिती जबाबदार आहे. आम्ही कोणत्याही स्वरुपात दहशतवादाचं समर्थन करत नाही. स्थानिक लोक दहशतवाद्यांचे लक्ष्य असू नयेत. आमच्या या भूमिकेबद्दल आम्हाला कोणतीच शंका नाही. परंतु जर स्थानिक पातळीवर भारत सरकारला लक्ष्य करत असतील तर पाकिस्तानला लक्ष्य करणं सोपं होतं”, असंदेखील आसिफ म्हणाले. यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT) वरिष्ठ कमांडर सैफुल्लाह कसुरी ऊर्फ खालिद हा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलंय. सैफुल्लाह खालिद हा पाकिस्तानातील गुजरानवाला शहरातून काम करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील इतर दोन कार्यकर्त्यांनीही या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं समजतंय.
काश्मीरमधील हा गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला होता. यावेळी दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना लक्ष्य केलं. पहलगाममधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं. तिथं जाण्यासाठी अरुंद वाट असल्याने पर्यटकांना आडोशाला जाण्याची संधी मिळाली नाही.
