
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची भूमिका भारताने घेतली आहे. विशेष म्हणजे भारताने हल्ला केल्यास आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ, अशी पोकळ धमकी पाकिस्तानने दिली आहे. दरम्यान, भारताला घेरण्यासाठी पाकिस्तानने मोठा कट रचल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानसोबत इतर चार देश एकत्र आले असून भारताविरोधात डिजिटल युद्ध करण्याचा पाकिस्तानचा डाव समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानाचा भारताविरोधातील डिजिटल प्लॅन उघड झाला आहे. गेल्या सहा दिवसांत भारतावर तब्बल 10 लाख सायबर हल्ले झाले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलला ही माहिती मिळालेली आहे. पाकिस्तानसह एकूण पाच देशांचा या सायबर हल्ल्यांत समावेश आहे. महाराष्ट्राच्या इकोज ऑफ पहलगाम या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तानसह इंडोनेशिया, मोरोक्को, बांगलादेश या देशांतील वेगवेगळ्या गटांचा या सायबर हल्ल्यांत समावेश आहे.
भारताविरोधातल्या संभाव्य युद्धाची पाकिस्तानने धसकी घेतली आहे. पाकिस्ताने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये म्हणून ते साठवून ठेवावेत, अशी सूचना पाकिस्ताने आपल्या नागरिकांना केली आहे. तसेच पाकिस्तानने युद्धाभ्यासही चालू केला आहे.
दुसरीकडे भारताची राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय सैन्यातले सर्वोच्च अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री यांच्यासोबत अनेक बैठका पार पडल्या आहेत. त्यामुळे त्यामुळे आगामी काळात भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेऊन पाकिस्तानविरोधात एकूण पाच निर्णय घेतले होते. या निर्णयांमध्ये भारताने सिंधू जलवाटप करार स्थगिती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पाकिस्ताननेही प्रत्युत्तरादाखल भारतासोबत कोणत्याही व्यापारावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा केली. त्या सर्व घडामोडी घडत असताना भारतातील नागरिकांकडून पाकिस्तानवर हल्ला करावा, अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी काश्मीरमधील लोकांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.