
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जातोय. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. या नृशंस हल्ल्यात आतापर्यंत एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच हा देशाच्या ऐक्याचा विषय असून सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत संघाचे अखील भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी व्यक्त केले आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आंबेकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. “जम्मू-काश्मीरमध्ये झालेला हा हल्ला हा अत्यंत निषेधार्ह आहे. प्रत्येकाने मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे. कारण हा भारताच्या एकात्मतेचा आणि अखंडतेचा प्रश्न आहे,” असे आवाहन आंबेकर यांनी केले.
तसेच, “हा हल्ला करणाऱ्यांवर कोठर आणि योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे. मला वाटतं. सरकार या दृष्टीने कृती करत आहे,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पलहगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. तसेच अशा कठीण प्रसंगी सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.
#WATCH | Mumbai: On #PahalgamTerroristAttack, Sunil Ambekar, Akhil Bharatiya Prachar Pramukh, RSS says, “The attack that happened in Jammu and Kashmir yesterday is extremely condemnable… Forgetting all the differences, everyone should come together as this is an issue of the… pic.twitter.com/eQO9JxuuyL
— ANI (@ANI) April 23, 2025
दरम्यान, अचानकपणे झालेल्या या हल्ल्यानंतर भारतीय सेना अलर्ट मोडवर आहे. वायू सेना, नौदल आणि आर्मीला अलर्ट राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर या हल्ल्याचा जशास तसा बदला घेतला जाईल, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जाणांचा मृत्यू झाला आहे. मृत पर्यटक हे डोंबिवली आणि पुण्यातील आहेत. गुजरात, कर्नाटक तसेच इतरही राज्यातील पर्यटकांचा मृतांमध्ये मावेश आहे. महाराष्ट्राच्या सर्व पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.