पाकिस्तानचा भारतावर मोठा सायबर हल्ला, अत्यंत महत्त्वाच्या वेबसाईट हॅक

पाकिस्तानी हॅकर्सनी भारतावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. अनेक महत्त्वाच्या साईट हॅक केल्याचा दावा करण्यात येत आहे.

पाकिस्तानचा भारतावर मोठा सायबर हल्ला, अत्यंत महत्त्वाच्या वेबसाईट हॅक
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 05, 2025 | 6:31 PM

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पाकिस्तानी हॅकर्सनी भारतावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील अनेक संरक्षण क्षेत्राशी संबंधित वेबसाइट हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘पाकिस्तान सायबर फोर्स’ या ट्विटर हँडलवरून हा दावा करण्यात आला आहे. भारतीय संरक्षण संस्थांचा संवेदनशील डेटा हॅक केल्याचा दावा या गटानं केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था (IDSA) यांच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक तपशीलाचा समावेश आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी हॅकर्सनी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पीएसयू आर्मर्ड व्हेईकल कॉर्पोरेशन लिमिटेडची वेबसाइटही हॅक केली आहे. या वेबसाईटवर पाकिस्तानी ध्वज आणि अल खालिद टँकचे फोटो पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता खबरदारी म्हणून ही वेबसाइट तात्पुरत्या स्वरुपात ऑफलाईन करण्यात आली आहे, तसेच सायबर ऑडिटला देखील सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान या सायबर हल्ल्यानंतर आता भारतीय सायबर सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. पाकिस्तानकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्यांवर सायबर सुरक्षा संस्था लक्ष ठेवून आहेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यानंतर आता डिजिटल सुरक्षा वाढवण्यात येत असून, पुन्हा असा हल्ला होऊ नये यासाठी पाउले उचलली जात आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानला आता त्यांच्याच देशातून विरोध होत आहे, हे युद्ध धर्म युद्ध नाही, दोन देशांमधील युद्ध आहे, त्यामुळे सरकारच हे युद्ध लढेल. नागरिकांनी या युद्धात पडू नये असं आवाहन पाकिस्तानच्या लाल मशि‍दीमधील मौलवींनी केलं आहे. पाकिस्तानी सैन्याच्या पीओकेमध्ये हालचाली वाढल्या असून, त्यांच्या सैनिकांकडून वारंवार शस्त्रसंधीचं देखील उल्लंघन होत आहे.