
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. या हल्ल्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. अटारी बॉर्डर बंद करण्यात आली असून, आयात, निर्यात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधू जल वाटप करार देखील स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर प्रचंड दबाव वाढला आहे.
याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधून एका पाकिस्तानी जवानाला ताब्यात घेण्यात आलं आहे. श्रीगंगानगर परिसरातून या पाकिस्तानी जवानाला ताब्यात घेण्यात आलं आहे. भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या जवानाकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे, दहशतवादी आणि त्यांच्या आकाला सोडणार नाही, कडक कारवाई केली जाईल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानवर दबाव वाढला
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे. भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. व्यापर बंद असल्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. पाकिस्तानमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर करण्यासाठी मध्यस्थी करावी अशी विनंती आता पाकिस्तानकडून त्याच्या मित्र राष्ट्रांना करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
अमेरिकेची तटस्थ भूमिका
दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र अमेरिकेनं तटस्थ भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. दोन्ही देश आमच्यासाठी जवळचे आहेत, चर्चा करून तणावावर ते मार्ग काढतील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.