
पाकिस्तानची सर्वोच्च धार्मिक संस्था कौन्सिल ऑफ इस्लामिक आयडिओलॉजीने (CII) एक महत्त्वपूर्ण निकाल देताना म्हटले आहे की, मुस्लिम पुरुषाच्या पहिल्या पत्नीला तिच्या पतीने तिच्या संमतीशिवाय दुसरे लग्न केले तरी त्याचे लग्न रद्द करण्याचा अधिकार नाही. CII च्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या या निर्णयामुळे देशातील बहुपत्नीत्वाशी संबंधित कायदेशीर आणि धार्मिक चर्चेला उधाण आले आहे.
CII चा सल्ला आहे की, पाकिस्तानातील कायदे इस्लामी तत्त्वांशी सुसंगत असावेत. पतीच्या दुसऱ्या लग्नाच्या आधारे पहिल्या पत्नीला तिचे लग्न रद्द करण्याचा अधिकार देणे इस्लामी तत्त्वांच्या विरोधात आहे. कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, शरिया पुरुषांना चार विवाह करण्याची परवानगी देते आणि पहिल्या पत्नीच्या संमतीची कोणतीही अट नाही. CII चे अध्यक्ष मौलाना मोहम्मद खान शिरानी यांनी सांगितले की, शरीयतनुसार पुरुषाला दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही. हा कायदा इस्लामी शिकवणीशी सुसंगत नाही.
दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीची संमती किंवा लवाद परिषदेची मान्यता आवश्यक असल्याचा निकाल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. CII ने न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली आणि दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीची संमती बंधनकारक करणाऱ्या मुस्लिम कौटुंबिक कायदा अध्यादेश 1961 मध्ये सुधारणा करण्याची विनंती सरकारला केली.
विवाह करारामध्ये थॅलेसेमिया आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या वैद्यकीय चाचण्यांचा समावेश करणे बंधनकारक करणार नाही, असे CII ने म्हटले आहे.
बहुपत्नीत्वाबाबत पाकिस्तानात बराच काळ वाद
मुस्लीम कौटुंबिक कायदा अध्यादेश 1961 नुसार पुरुषाला दुसरे लग्न करण्यापूर्वी त्याची पहिली पत्नी आणि लवाद परिषदेची लेखी परवानगी घ्यावी लागते. या कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. मात्र ही अट इस्लामिक शरियाच्या विरोधात असून ती काढून टाकण्यात यावी, असे CII चे म्हणणे आहे. तर दुसरीकडे महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांनी हा कायदा महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
CII च्या या निर्णयावर पाकिस्तानच्या सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे. एक्सवर एका युजरने लिहिले की, “हा निर्णय महिलांच्या अधिकारांवर हल्ला आहे. CII ला आपल्याला 21 व्या शतकात मध्ययुगात घेऊन जायचे आहे. स्त्रियांच्या भावनांना आणि सन्मानाला किंमत नाही का?‘’
प्रसिद्ध माहितीपट निर्माती शर्मीन ओबेद-चिनॉय यांनी ट्विट केले की, CII पुन्हा एकदा आम्हाला अभिमान वाटतो आहे. दुसऱ्या लग्नासाठी पत्नीची संमती आवश्यक नाही का? हे लाजिरवाणे आहे. आणखी एका युजरने लिहिले की, ‘यामुळे पुरुषांना हवं ते करण्याची मोकळीक मिळते. स्त्रियांना केवळ वस्तू म्हणून वागवले जात आहे. काही लोकांनी मजाही केली. आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. CII ने पुरुषांना हिरवा कंदील दाखवला आहे. दुसऱ्याने म्हटले की, “पहिल्या बायकोला कळणारही नाही आणि दुसरे लग्न होऊन जाईल.” वाह, काय स्वातंत्र्य!