PM Modi-Donald Trump Tariff : ट्रम्प खूप बोलले, मोदींनी एका वाक्यात विषय संपवला, ‘मी प्रत्येक किंमत मोजायला तयार’

PM Modi-Donald Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भारतावर टॅरिफ लावण्याची धमकी देत होते. आधी ते 25 टक्के म्हणत होते, नंतर काल अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावत असल्याचं जाहीर केलं. या सगळ्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले आहेत. त्यांनी अमेरिकेला जशास तस उत्तर दिलं आहे.

PM Modi-Donald Trump Tariff : ट्रम्प खूप बोलले, मोदींनी एका वाक्यात विषय संपवला, मी प्रत्येक किंमत मोजायला तयार
modi trump
| Updated on: Aug 07, 2025 | 10:53 AM

PM Modi First Statement On Donald Trump Tariff : अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “भारत शेतकऱ्यांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही. शेतकरी आणि मच्छीमार यांच्या हिताशी कुठलीही तडजोड होणार नाही” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. “याची मला व्यक्तीगत पातळीवर मोठी किंमत चुकवावी लागेल. पण मी प्रत्येक किंमत मोजायला तयार आहे” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भारतावर टॅरिफ लावण्याची धमकी देत आहेत. त्यांनी 50 टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावणार असल्याचं म्हटलं होतं.

काल रात्री अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वारंवार सार्वजनिक मंचावर अशी वक्तव्य करत होते. पण भारत सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळत होता. अमेरिकेसोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचा भारताने प्रयत्न केला. अमेरिकेसोबत ट्रेड डीलवर प्रदीर्घ चर्चा झाली. पण डेअरी आणि कृषी क्षेत्र खुली करण्याची अमेरिकेची मागणी मान्य झाली नाही. त्याचवरुन ट्रेड डील फिस्कटली. काहीही झालं तरी हे सेक्टर खुलं करणार नाही असं भारताने स्पष्ट केलय.

‘पण मी यासाठी तयार आहे’

देशातील हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांच्या जन्म शताब्दी महोत्सव कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. “आमच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच हित सर्वोच्च आहे. भारत आपले शेतकरी, मच्छीमार आणि डेअरी शेतकरी यांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणारं नाही. मला माहितीय, यासाठी मला व्यक्तीगत पातळीवर मोठी किंमत चुकवावी लागेल. पण मी यासाठी तयार आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

‘शेतकऱ्यांची ताकद देशाच्या प्रगतीचा आधार’

“माझ्या देशातील मच्छीमारांसाठी, पशु पालकांसाठी भारत तयार आहे. शेतकऱ्यांच उत्पन्न वाढवणं, शेती खर्च कमी करणं, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत बनवण्याच्या लक्ष्यांवर आम्ही काम करत आहोत. आमचं सरकार शेतकऱ्यांची ताकद देशाच्या प्रगतीचा आधार मानते” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.