
भारत आणि पाकिस्तान या दोन देशाचं शत्रूत्व उभ्या जगाला माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना अचानक पाकिस्तानचा दौरा केल्याचे अनेकांना धक्का बसला होता. तर भाजपाचे बुजूर्ग नेते लालकृष्ण आडवाणी यांनी जिना यांचे कौतूक केल्याने त्यांचे राजकीय करीयर अडचणीत आले होते. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक बहिण पाकिस्तानी असून ती गेली दोन दशके त्यांना राखी बांधते.
पाकिस्तानात राहणाऱ्या कमार शेख या गेली दोन दशके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी हटकून दिल्लीला येत असतात. येत्या 19 ऑगस्टला देखील त्या भारताची राजधानी दिल्लीला येतील असे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधायचे हे त्यांचे 30 वे वर्ष असणार आहे. कमार शेख यांनी त्यांच्या 19 ऑगस्टला दिल्लीच्या फ्लाईटचे तिकीट देखील बुक केलेले आहे. कोविड – 19 साथीमुळे गेली तीन वर्षे 2020, 2021,आणि 2022 त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधू शकल्या नव्हत्या. परंतू गेल्यावर्षी साल 2023 मध्ये मात्र त्या आपल्या पतीसमवेत दिल्लीला आल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखी बांधली होती. या वर्षी देखील आपल्याला निमंत्रण मिळेल अशी त्यांना आशा आहे. आपल्या भावाला चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
आज तक वृत्त वाहिनीशी बोलताना कमार शेख म्हणाल्या की आपण बाजारातून राखी विकत नाही. आपल्या लाडक्या भावासाठी आपण हाताने राखी बनवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यंदाच्या वर्षी आपल्या भावाला शोभेल अशी खास वेलवेटपासून राखी तयार केलेली असून त्यात मोती, धातूची एम्ब्रायडरी केलेली असल्याचे कमार शेख यांनी या वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले.
एका मुस्लीम कुटुंबात कराचीत कमार शेख जन्मल्या होत्या. त्यांनी साल 1981 मध्ये अहमदाबादच्या मोहसीन शेख यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्या पाकिस्तानातून स्थलांतर होत भारतात येऊन राहू लागल्या आहेत. साल 1990 मध्ये कमार शेख यांची नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख झाली होती. गुजरातचे स्वर्गीय राज्यपाल स्वरुप सिंग यांच्यामुळे कमार शेख यांची गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर त्या दरवर्षी आपल्या हाताने राखी तयार करुन दिल्लीला येऊन मोदी यांना राखी बांधतात.