जाळपोळ, रेल्वे आणि रास्ता रोको, रस्ते ओस… बिहारपासून राजस्थानपर्यंत देशव्यापी बंद; कुठे काय काय घडतंय?

देशभरात बंद सुरू आहे. एससी एसटीच्या आरक्षणात सब कॅटेगिरी ठेवण्यात आली आहे. त्याचा विरोध म्हणून दलित आणि आदिवासी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. तसेच काही राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहेत. बंदचा मोठा परिणाम जाणवत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ, रेल्वे रोको आणि रास्ता रोको सुरू आहे.

जाळपोळ, रेल्वे आणि रास्ता रोको, रस्ते ओस... बिहारपासून राजस्थानपर्यंत देशव्यापी बंद; कुठे काय काय घडतंय?
Bharat Bandh
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2024 | 12:29 PM

एससी-एसटी आरक्षणात सब कॅटेगिरी ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर दलित आणि आदिवासी समाजातून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदचा देशभर चांगलाच परिणाम झाला आहे. बिहार, झारखंड आणि राजस्थान सारख्या देशातील महत्त्वाच्या राज्यात जाळपोळ करण्यात येत आहे. आंदोलकांनी रेल्वे रुळाचा ताबा घेऊन रेल्वे रोको केला आहे. काही ठिकाणी रास्ता रोको होत आहे. त्यामुळे हा बंद प्रचंड यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे.

देशभरातील दलित आणि आदिवासी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. दलित आणि आदिवासी संघटनांच्या राष्ट्रीय परिसंघ (NACDAOR) या संघटनेने तर दलित आणि आदिवासींच्या न्याय मागण्यांची एक यादीच जाहीर केली आहे.

बिहारमध्ये या बंदचा सर्वाधिक परिणाम जाणवला आहे. बिहारच्या वैशाली येथे लोजपा रामविलास पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हाजीपूर रामशीष चौकात रास्ता रोको केला. तसेच रस्त्यावर प्रचंड जाळपोळ करत आपला निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना त्रास होत आहे. हाजीपूर, छपरा, मुजफ्फरपूर, पटना, सिवान आदी भागात मोठं आंदोलन करण्यात आलं आहे. बिहारमध्ये भीम सेनेने रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. बिहारमध्ये तर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्जही केला आहे.

बिहारमध्ये उग्र आंदोलन

बिहारच्या जहनाबादमध्ये नॅशनल हायवे एनएच83 जाम करण्यात आला आहे. आरक्षण बचाओ संघर्ष समितीने हे आंदोलन केलं आहे. बिहारच्याच सहरसामध्ये भीमसेनेने रास्ता रोको करत जाळपोळ केली आहे. तर आरामध्ये भीम आर्मीने रेल्वे रोको केला आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे ठप्प झाली आहे. पूर्णियात आंदोलकांनी टायर जाळून आंदोलन केलं. पटना सायन्स कॉलेजच्या जवळही आंदोलकांनी निदर्शने सुरू केली आहेत. संविधानाशी छेडछाड करू देणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश, ओडिशा, झारखंडमध्ये कडकडीत बंद

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज कडकडीत भारत बंद करण्यात आला. राजस्थानात पाच जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जयपूर, भरतपूर, गंगापूर सिटी, दौसा आणि डीग या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जयपूरमध्ये दुकाने बंद आहेत. अजमेरमध्ये आरक्षण बचाओ संघर्ष समितीने उग्र निदर्शने केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय मागे घेण्याची मागणी केली जात आहे. ओडिशातही प्रचंड आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी रास्ता रोको आणि रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. झारखंडच्या रांचीमध्ये खासगी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक बसस्थानकांवर बसेसच्या रांगा लागल्या आहेत. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्येही बंदचा मोठा परिणाम जाणवला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नवी दिल्ली, नोएडात जोरदार आंदोलन

नवी दिल्लीतही बंदचा चांगलाच परिणाम जाणवत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. बसपाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत मोठा रास्तारोको केला आहे. त्यामुळे लोक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. पूर्व दिल्लीतील कल्याणपुरी येथे या बंदचा मोठा परिणाम जाणवत आहे. ग्रेट नोएडामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम आर्मी आणि आजाद समाज पार्टीने जोरदार निदर्शने केली. समजावादी पार्टीचे कार्यकर्तेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कूच करत आहेत. नोएडामध्ये पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व बस स्टॉपवर वॉच ठेवण्यात आला आहे. देशभरात ठिकठिकाणी जाळपोळ होत आहे. रेल्वे रोको आणि रास्ता रोको होत असल्याने रस्ते ओसाड पडले आहेत.