मोठी बातमी! बंडखोर आमदार पुन्हा ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व स्विकारणार? पश्चिम बंगालमध्ये डाव फिरला, घडामोडींना वेग
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. 58 आमदारांनी बंडखोरी करत वेगळ्या गटाची स्थापना केली. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का होता, मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये दोन महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. पश्चिम बंगालची सत्ता तृणमूल काँग्रेसच्या हातातून निसटताच पक्षात मोठी फूट पडली. आधी आमदाराचा एक मोठा गट पक्षातून बाहेर पडला. त्यानंतर तब्बल 20 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. काही दिवसांपूर्वी तर अशी देखील चर्चा सुरू होती की, ममता बॅनर्जी या आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करणार आहेत. परंतु आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री रवींद्रनाथ घोष यांनी रविवारी मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले रवींद्रनाथ घोष
रवींद्रनाथ घोष यांनी मोठा दावा केला आहे. की जर ममता बॅनर्जी यांनी आपला भाच्चा अभिषेक बॅनर्जी यांना सक्रिय राजकारणापासून दूर ठेवलं तर ज्या लोकांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वामध्ये उठाव केला होता, त्यातील अनेकजण पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल पक्षात परततील आणि ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व मान्य करतील. ऋतब्रत बॅनर्जी हे पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी तब्बल 58 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला होता. विधानसभा अध्यक्षाकडून या गटाला मान्यता देखील देण्यात आली होती. त्यानंतर रवींद्रनाथ घोष हे देखील पक्षातून बंडखोरी करत या बंडखोर गटात सामील झाले.
एकीकडे बंडखोर गटाकडून पक्ष ताब्यात घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत, मात्र असं असतानाच आता रवींद्रनाथ घोष यांनी हे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बंडखोर गटामध्ये देखील दोन गट पडणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच ममता बॅनर्जी या आता अभिषेक बॅनर्जींबद्दल काय निर्णय घेणार हे देखील पहावं लागणार आहे.