
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचे पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी संपूर्ण देशात केली जात आहे. विशेष म्हणजे विरोधी बाकावर असलेल्या राजकीय पक्षांनीही याला पाठिंबा दिला आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाम हल्ला, काश्मीरचे पर्यटन याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. त्यांनी मोदी यांनी नेमके काय केले पाहिजे, याबाबतही सांगितले आहे.
भारताची अंतर्गत यंत्रणा अपयशी ठरली, याबद्दल दुमत नाही. पहलगामचा हल्ला करणारे जे कोणी होते ते अजूनही शासनाला सापडलेले नाहीत. त्यांची चळवळ कुठून कुठे गेली? याची माहिती देखील शासनाला मिळालेली नाही. दहशतवादी लाईन ऑफ कंट्रोल (LOC) अद्याप पार गेलेत, असं मला तरी वाटत नाही, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
तसेच, पाकिस्तानचा विश्वास द्विराष्ट्र सिद्धांतावर आहे. त्यांचा हाच विचार पसरवण्यासाठी त्यांनमी ही घडना घडवून आणली आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
काश्मीरमध्ये पर्यटक गेले पाहिजेत. शासनाने त्या पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत. पावसाळा यायला अजून अजून एक महिना शिल्लक आहे, असे मी मानतो. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला निर्देश द्यावे की त्या-त्या राज्याने तेथील पर्यटकांची सोय करावी. केंद्र शासनाने या पर्यटकांना पूर्ण संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी, याबाबत निर्णय घेतला तर माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेतो, अशी जाहीर ऑफरही आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.
तसेच नरेंद्र मोदी यांनी पाकिस्ताविरोधात काय-काय निर्णय घ्यायला हवेत, याबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केले. “नरेंद्र मोदी यांच्या जागी मी असतो, तर मी पुतिन यांची नीती वापरली असती. युक्रेन जर नाटोकडे गेला तर रशियाला धोका असल्याची मानसिकता पुतीन यांची आहे. त्यामुळे त्यांनी युक्रेनच्या पायाभूत सुविधाच उद्ध्वस्त करून टाकल्या. आपल्यालाही अशीच काही नीती वापरली पाहिजे. अशी नीती वापरल्यास पाकिस्तान पुढच्या 30 वर्षात मागे जाईल,” असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.