Congress-CJP: काँग्रेससह मोठ्या आंदोलनाची तयारी? CJP चा मास्टरप्लॅन समोर, कुठून फुंकणार रणशिंग?
Congress-CJP Agitation: काँग्रेससह कॉकरोच जनता पार्टी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठी रणनीती आखण्यात येणार आहे. आता काँग्रेस त्याला कसा प्रतिसाद देते हे महत्त्वाचे आहे.

Congress-CJP Protest: काँग्रेस, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे भारताच्या राजकीय कॅन्व्हासवर ठसठशीतपणे समोर आले आहेत. प्रबळ आणि मोठे संख्याबळ असलेल्या सत्ताधाऱ्यांसमोर त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. गेल्या 10 दिवसांतील राजकीय घटनाक्रम पाहता विरोधकांनी देशात मोठे आंदोलन छेडल्याचे दिसते. कॉकरोच जनता पार्टीने गिअर टाकला आहे. जंतरमंतर हे आंदोलनाचे स्थळच बदलल्यानंतर आता सीजेपीने आंदोलनाची दिशा बदलली आहे. प्रत्येक राज्यात सीजेपी मोठे आंदोलन करणार आहे. त्याची सुरुवात राजस्थानमध्ये झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठी रणनीती आखण्यात आली आहे. काँग्रेससोबत आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. हे दोन्ही पक्ष एकाच प्लॅटफॉर्मवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावर ठाम
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते दीपक बालियान यांनी जयपूरमध्ये काल पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. त्यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीजेपी जंतरमंतरवरील आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी रेल्वे, बस आणि मेट्रो बंदी, तसेच इंटरनेट सेवा विस्कळीत केल्याप्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला. हा सर्व प्रकार लोकशाहीला धरून नसल्याचे ते म्हणाले.
देशातील प्रमुख शहरात आंदोलनाची हाक
आता सीजेपीने आंदोलनाची दिशा बदलली आहे. जंतरमंतरवर आंदोलन होईपर्यंत आता देशातील प्रमुख शहरात सीजेपी आंदोलन करणार आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या शहरात मत चोरी, ज्ञानेश कुमार यांच्या कथित कारभाराविरोधात आंदोलन उभे करण्यात येणार आहे. देशातील सर्व मोठ्या शहरातच जंतरमंतरसारखे आंदोलन करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
काँग्रेससह आंदोलनाची तयारी
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सुद्धा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. मतदारांची नाव वगळणं, SIR प्रक्रिया आणि लोकसभा, विधानसभा निवडणूक गडबड केल्याचा कथित आरोप विरोधक करत आहेत. आता विरोधकांसह सीजेपी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस सोबत आंदोलनाची तयारी केल्याची माहिती देण्यात आली आहे. जर सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन केले तर त्याचा मोठा परिणाम दिसेल असे सीजेपीचे म्हणणे आहे. आता काँग्रेस या आवाहनाला कसा प्रतिसाद देते हे येत्या काही दिवसात समोर येईल.