
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची अनेक बाजूंनी कोंडी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला कारवाईसाठी खुली सुट दिली आहे. त्यानंतर वेगवान हालचाली सुरु झाल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकांवर बैठका घेणे सुरु केले आहे. हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शुक्रवारी नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाईची कमान आपल्या हातात घेतली आहे. ते सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत बैठका घेत आहेत. पाकिस्तानसोबत कारवाईची रुपरेषा तयार केली जात आहे.
26 एप्रिल रोजी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक घेतली होती. ही बैठक सुमारे दीड तास चालली होती. त्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलास पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले.
30 एप्रिल रोजी पाकिस्तानविरुद्ध कारवाईच्या शक्यतेदरम्यान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या 7 लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते.
3 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. ती बैठक सुमारे एक तास चालली होती. आता रविवारी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली. ही बैठक सुमारे 40 मिनिटे चालली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की भारताच्या प्रत्युत्तराची वेळ, पद्धत आणि लक्ष्य हे सैन्याने स्वतः ठरवावे. या दिशेने येणारे सर्व अडथळे राजकीय नेतृत्वाकडून दूर करण्यात येणार आहे. यामुळे भारत लवकरच पाकिस्तानवर लष्करी कारवाई करेल, असे संकेत मिळेल.