भारत सरकारचा पाकिस्तानला पुन्हा एक दणका, सर्व वस्तूंच्या आयात-निर्यातीवर बंदी
India-Pakistan Tension: भारताने पाकिस्तानविरोधात अनेक निर्णय घेतल्यानंतर शनिवारी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानसोबत आयात-निर्यात पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील कोणतीही वस्तू भारतात मिळणार नाही.

India-Pakistan Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु केले आहे. भारताने पाकिस्तानविरोधात अनेक निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी भारत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानसोबत आयात-निर्यात पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील कोणतीही वस्तू भारतात मिळणार नाही. पाकिस्तानसोबतचे आर्थिक संबंध पूर्णपणे तोडण्याच्या दिशेने भारत सरकारकडून पावले टाकली जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलेगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे भक्कम पुरावे तपास संस्थांना मिळाले आहेत. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. त्यात सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यासह इतर अनेक निर्णय घेतले गेले आहे. तसेच केंद्र सरकारने लष्कराला पाकिस्तानवरील कारवाईबाबत पूर्ण सुट दिली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानचे कोणतेही साहित्य भारतात येणार नाही. पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणतीही वस्तू भारतात येणार नाही.
काय आहे अधिसूचना
वाणिज्य मंत्रालयाने 2 मे रोजी अधिसूचना काढली आहे. त्यात पाकिस्तानसंदर्भातील आयात-निर्यातीवरील बंदीचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतला गेल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये निर्मिती झालेली वस्तू सरळ किंवा तिसऱ्या देशांच्या माध्यमातून भारतात आयात होणार नाही. भारत सरकारने लादलेले हे निर्बंध २०२३ च्या परराष्ट्र व्यापार धोरणातील नवीन तरतुदीनुसार घेतले गेले आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही परिस्थितीत आयातीची गरज लागत असेल तर त्यासाठी भारत सरकारच्या विशेष मान्यता आवश्यक असेल.
भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापारी संबंध मर्यादीत आहे. परंतु दोन्ही देश एक-दुसऱ्यांना काही वस्तूंची आयात-निर्यात करतात. पाकिस्तान भारताला ड्रॉयफ्रूट, टरबूज, सिमेंट, सेंधा मीठ आयात करते. तर भारताकडून पाकिस्तानला दगड, चुनखडी, चष्म्यासाठी ऑप्टिकल वस्तू, कापूस, स्टील, सेंद्रिय रसायने, धातू संयुगे आणि चामड्याच्या वस्तू देखील आयात केल्या जातात.
