आधी पंतप्रधान मोदींनीच लस टोचवून घ्यावी, काँग्रेस नेत्याचं आवाहन

| Updated on: Jan 04, 2021 | 7:35 AM

लस निर्मितीचं श्रेय मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप बिहार काँग्रेसच्या नेत्याने केला आहे.

आधी पंतप्रधान मोदींनीच लस टोचवून घ्यावी, काँग्रेस नेत्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली: भारतात 3 कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण आता लसीकरणावरुनही राजकारण पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही भाजपची लस असून, आपण ती घेणार नसल्याचं म्हटलं आहे. तर आता बिहारमधील एका काँग्रेस नेत्यानं पंतप्रधान मोदींनी ही लस टोचवून घेत शंका दूर करावी असं आवाहन केलं आहे. (Congress appeals to PM Modi should be vaccinated against corona at the beginning)

बिहार विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते अजित शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं आहे. ज्या प्रमाणे लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी रशिया आणि अमेरिकेच्या अध्यक्षांनी सुरुवातीला लस टोचवून घेतली. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची लस सुरुवातीलाच टोचवून घ्यावी. जेणेकरुन या लसीवर जनता विश्वास ठेवेल, असं अजित शर्मा म्हणाले.

‘काँग्रेसलाही श्रेय मिळावं’

अजित शर्मा यांनी कोरोना लसीवरुन भाजपवर आरोपही केलाय. या लस निर्मितीचं श्रेय मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. पण सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक या कंपन्या काँग्रेसच्या काळात स्थापन करण्यात आल्या होत्या, असं शर्मा यांनी म्हटलंय. कोरोना लस आल्यानंतर भाजप त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण काँग्रेसलाही याचं श्रेय मिळायला हवं. कारण काँग्रेस काळात या लस निर्मिती कंपन्यांची स्थापना झाल्याचंही अजित शर्मा म्हणाले. दरम्यान, अजित शर्मा यांनी पंतप्रधान मोदींना केलेल्या आवाहनावर अद्याप भाजपकडून कुठलिही प्रतिक्रिया आलेली नाही.

लस घेणार नाही – अखिलेश यादव

अखिलेश यादव म्हणाले, “मी सध्या तरी कोरोना लस घेणार नाहीये. भाजपच्या कोरोना लसीवर मी विश्वास कसा ठेवावा? आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वांसाठी मोफत कोरोना लस देऊ. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही.”

ओमर अब्दुल्ला आनंदाने लस घेणार!

‘आपण आनंदाने कोरोनाची लस घेणार आहोत. कारण ही लस कुण्या एका पक्षाची नाही तर मानवतेशी जोडली गेलेली आहे’, असं अब्दुल्ला म्हणाले. तसंच देशातील जेवढ्या जास्त लोकांनाही ही लस दिली जाईल, तेवढंच ती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही उपयुक्त ठरेल, असंही जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

भारतात 3 कोरोना लसींना मंजुरी मिळाली आहे. देशात आणि जवळपास सर्व राज्यांमध्ये लसीकरणाची तयारीही पूर्ण झाली आहे. अशास्थितीत लसीकरणावरुन सुरु झालेलं राजकारण पुढे काय रुप घेतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या: 

कोरोनावरच्या तिसऱ्या लसीला मंजुरी, ‘ही’ लस ठरणार रामबाण?

2 नव्हे तर 3 लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी? वाचा अजून एक गुड न्यूज

Fact check | कोरोना लसीमुळे खरंच नपुंसकत्व येतं?, जाणून घ्या नेमकं सत्य काय?

Congress appeals to PM Modi should be vaccinated against corona at the beginning