पंजाबसाठी मोठा दिवस, काँग्रेसचं मुख्यमंत्रीपदाचं नाव जवळपास निश्चित, सत्तेचा फॉर्म्युलाही ठरला, सिद्धूंचं काय होणार?

| Updated on: Sep 19, 2021 | 6:55 AM

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे. कारण सुनील जाखड यांच्याच गळ्यात पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. जाखड हे माजी खासदार आहे तसच माजी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षही आहेत.

पंजाबसाठी मोठा दिवस, काँग्रेसचं मुख्यमंत्रीपदाचं नाव जवळपास निश्चित, सत्तेचा फॉर्म्युलाही ठरला, सिद्धूंचं काय होणार?
Amrinder Singh and Sunil Jakhad
Follow us on

मुंबई : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे. कारण सुनील जाखड यांच्याच गळ्यात पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. जाखड हे माजी खासदार आहे तसच माजी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षही आहेत. विशेष म्हणजे पंजाबमध्ये काँग्रेस एक नाही तर दोन उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्याच्या तयारीत आहे. त्यात एक दलित तर दुसरा शीख उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. म्हणजेच पंजाबमध्ये राहीलेल्या काळासाठी हिंदू-दलित-शीख असा सत्तेचा काँग्रेस फॉर्म्युला ठरताना दिसतोय. आजच पुन्हा काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आलीय. त्यावर जाखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत.

कोण होणार उपमुख्यमंत्री?

सुनील जाखड यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलं तरी उपमुख्यमंत्रीपदासाठी आता रेस सुरु झालीय. यात दलित समुदयाकडून माजी कॅबिनेट मंत्री चरणजीतसिंह आणि आमदार राजकुमार वेरका यांची नावं आघाडीवर आहेत. दोघांपैकी एकाला उपमुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. तर शीखांकडून कॅप्टन अमरींदरसिंह यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उभारणारे माजी कॅबिनेट मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांचं नाव चर्चेत आहे. सुखजिंदर हे नवज्योतसिंह सिद्धूचे निकटवर्तीयही मानले जातात.

सिद्धूचं नेमकं काय होणार?

आश्चर्य म्हणजे ज्या नवज्योतसिंह सिद्धुंमुळे कॅप्टन अमरींदरसिंह यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांचं नाव कुठेच चर्चेत नाही. म्हणजे ना मुख्यमंत्री म्हणून ना उपमुख्यमंत्रीपदासाठी. सुनील जाखड हे जर मुख्यमंत्री झाले तर त्यांच्याच नेतृत्वात पुढच्या वर्षी काँग्रेस पंजाब विधानसभेच्या निवडणुका जिंकेल. खुद्ध सिद्धु वर्षभरासाठी मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक नसल्याचं समजतं. तसच काँग्रेस हायकमांडही सिद्धूच्या नावासाठी फार सकारात्मक नाही. कारण सिद्धू आणि कॅप्टन अमरींदरसिंह यांच्यातल्या गटबाजीमुळे काँग्रेसला पंजाबमध्ये खांदेपालट करण्याची वेळ आलीय. ह्या नेत्यांमध्ये संबंध खराब झालेत. खुद्द अमरींदरसिंह यांनी सिद्धूचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी तिथल्या लष्करप्रमुखाशी संबंध असून हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचा आरोप अमरींदरसिंह यांनी केलाय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सिद्धूंकडे सत्ता सोपवली तर काँग्रेसला फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची चिन्हं आहेत. सिद्धू स्वत:ही येणाऱ्या विधानसभेला स्वत:चा जलवा दाखवूनच मुख्यमंत्रीपद मिळवू इच्छितायत अशीही एक चर्चा आहे. त्यामुळेच बंड जरी सिद्धू आणि कंपनीनं केलं असलं तरी आता मात्र ते स्वत:ला दूर ठेवण्याच्या विचारात आहेत.

कोण आहेत सुनील जाखड?

सुनील जाखड हे माजी खासदार आहेत, राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. ते 2002 ते 2017 असे सलग तीन टर्म अबोहर विधानसभा मतदार संघातून निवडूण आले. 2012 ते 17 दरम्यान ते पंजाब विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेही होते. गुरुदासपूरमधून सुनील जाखड खासदार झालेले होते. 2017 च्या पोटनिवडणुकीत त्यांना यश मिळालं होतं. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा गुरुदासपूरमधून पराभव झाला. अभिनेता सनी देओलनं तो केला. जाखड यांना मुख्यमंत्री केलं तर पंजाबमधली हिंदू मतं काँग्रेससोबत राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.

हे ही वाचा :

क्रिकेट असो की राजकारण… ‘कॅप्टन’विरोधात सिद्धूंचं कायम बंड; सेकंड इनिंगमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग ‘क्लीन बोल्ड’

TMC मध्ये आल्याने बाबुल सुप्रियोंवर ममता बनर्जी खुश, पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता