
गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धानं आता गंभीर वळणं घेतलं आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. युरोपीय देश युक्रेनला शस्त्रपुरवठा करत असल्याचा आरोप रशियाकडून वारंवार केला जात आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जर्मनी आणि इंग्लंड हे दोन मोठे देश रशियाच्या रडारवर आले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या सर्गेई करागानोव यांनी आता थेट जर्मनी आणि ब्रिटनला धमकी दिली आहे, जर युद्धामध्ये रशिया हारलं तर आम्ही ब्रिटन आणि जर्मनीमध्ये अण्वस्त्र हल्ला करू असं सर्गेई यांनी म्हटलं आहे. गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, यावर कोणताही तोडगा निघण्यास तयार नाहीये, अशा परिस्थितीमध्ये आता रशियाकडून थेट जर्मनी आणि ब्रिटनला धमकी देण्यात आली आहे.
फक्त जर्मनी आणि ब्रिटनलाच का धमकी?
करागानोव यांनी टकर कार्लसनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, रशियाला सर्वात मोठा धोका हा युरोपीयन राष्ट्रांकडून आहे. जे सातत्यानं युक्रेन आणि रशियामधील युद्धाला हवा देत आहेत. रशियाच्या मते युरोपमध्ये ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स हे तीनच बलाढ्य देश आहेत. त्यातील दोन देश ब्रिटन आणि जर्मनी हे सातत्यानं युक्रेनच्या सैन्याला मदत करत आहेत, त्यांना शस्त्रांचा पुरवठा करत आहेत. एवढंच नाही तर ते सातत्याने रशियाविरोधात कट कारस्थान रचत असल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला आहे. रशियानं या दोन्ही देशांचा आपल्या अनफ्रेन्डली नेशंस यादीमध्ये समावेश केला आहे.
ब्रिटन आणि जर्मनीकडून सातत्यानं आमच्या हलचालींवर पाळत ठेवली जात आहे. ब्रिटन अमेरिकेच्या मदतीने आमचे तेल टँकर आडवून जप्त करत आहे. याला आम्ही आर्थिक युद्ध मानतो, त्यामुळे जर ब्रिटन आणि जर्मनीने त्यांच्या कारवाया बंद केल्या नाहीत तर आम्ही त्यांच्यावर अण्वस्त्र हल्ला करू अशी धमकी आता रशियाकडून देण्यात आली आहे.