Rahul Gandhi ED Inquiry : राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर, तब्बल साडे 8 तास चौकशी; पुन्हा बोलावलं जाणार?

| Updated on: Jun 13, 2022 | 9:58 PM

खासदार राहुल गांधी यांची आजची ईडी चौकशी संपली आहे. दोन टप्प्यात तब्बल साडे आठ तास राहुल गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात होते. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आता ते काँग्रेस मुख्यालयात जाणार आहेत.

Rahul Gandhi ED Inquiry : राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर, तब्बल साडे 8 तास चौकशी; पुन्हा बोलावलं जाणार?
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आजची ईडी चौकशी संपली आहे. दोन टप्प्यात तब्बल साडे आठ तास राहुल गांधी दिल्लीतील अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडी कार्यालयात होते. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आता ते काँग्रेस मुख्यालयात जाणार आहेत. तिथे काँग्रेसच्या नेत्यांना थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात जात आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. नॅशनल हेराल्ड (National Herald Case) प्रकरणात राहुल गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. दोन नोटिसांनंतर राहुल गांधी आज ईडी कार्यालयात पोहोचले. मात्र, त्यावेळी काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. दिल्लीसह देशात विविध राज्यात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.

राहुल गांधी यांची आज दोन सत्रात ईडी चौकशी झाली. सकाळच्या सत्रात त्यांची 3 तास चौकशी झाली. त्यानंतर त्यांनी लंच ब्रेक घेतला. त्याच ब्रेकमध्ये ते आणि प्रियंका गांधी गंगाराम रुग्णालयात जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेऊन आले होते. त्यानंतर दुपारी चार वाजता पुन्हा राहुल गांधी यांची चौकशी सुरु झाली. आज सुमारे साडे आठ तास त्यांची चौकशी झाली. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यानी केलेल्या चौकशीत अद्याप काही प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा एकदा पुराव्यासह पोहण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

चौकशीत मास्क काढला नाही

राहुल यांना पाणी देण्यात आले. त्यांना चहा कॉफीही विचारण्यात आली, मात्र त्यांनी नकार दिला. चौकशीत एकदाही त्यांनी मास्क काढला नाही. राहुल यांनी अधिकाऱ्याला नाव आणि पद विचारले. त्यावेळी त्यांनी इथे केवळ काँग्रेस नेत्यांची चौकशी होते की, इतर कुणाला तुम्ही कधी बोलवता का, असा प्रश्न विचारला. त्यावर अधिकाऱ्याने उत्तर दिले नाही.

राहुल यांना कोणते प्रश्न?

यंग इंडियात तुमची काय भागिदारी आहे, असे त्यांना विचारण्यात आले. यंग इंडियाचे शेअर्स तुम्ही तुमच्या नावे का केले, असेही त्यांना विचारण्यात आले. यंग इंडियात किती टक्के भागिदारी आहे, हेही त्यांना विचारण्यात आले. तुमच्यासह इतर कुणाचे यात शेअर्स आहेत हेही विचारण्यात आले.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड प्रकरणात 55 कोटींचा गैरव्यवहार झाला होता. याबाबत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता. 2012मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. 2008 मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर 90 कोटीचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रेसने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा असे काही नेते या कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते. तर इतरांकडे 24 टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटीचं कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहन केलं होतं.