राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी जितेंद्र सिंह यांच्यापुढे पाच मागण्या ठेवल्या आहेत. याच मागण्यांचा संदेश घाऊन आता जितेंद्र सिंह हे अमित शाहांच्या भेटीसाठी निघाले आहेत.

Rahul Gandhi Delhi Protest : सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाची देशभरात चर्चा आहे. या आंदोलनाला देशातून पाठिंबा वाढत आहेत. काहीही झालं तरी जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी घेतली आहे. या भूमिकेनंतर आता पुन्हा एकदा हजारो आंदोलनक दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर जमा झाले आहेत. एकीकडे जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना दुसरीकड काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस आणि विरोधकांनी पंंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राहुल गांधी यांनी केंद्रापुढे एकूण पाच मागण्या मांडल्या आहेत.
राहुल गांधी यांची भूमिका काय?
राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांनी मोदी यांच्या निवासस्थानापुढे ठिय्या मांडला आहे. मागच्या तीन तासांपासून हे ठिय्या आंदोलन चालूच आहे. या आंदोलनात मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. संसदेत विद्यार्थ्यांच्या आंंदोलनावर, त्यांच्यावर केलेल्या लाठीमारावर चर्चा केली जात नाहीये. म्हणूनच आम्ही हा ठिय्या मांडत आहोत, अशी भूमिका यावेळी राहुल गांधी यांनी घेतली आहे.
राहुल गांधी यांच्या मागण्या काय?
राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राहुल गांधी यांची भेट घ्यायला पाठवले होते. जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनस्थळी जात त्यांच्याशी चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार या चर्चेत राहुल गांधी यांनी जितेंद्र सिंह यांच्यापुढे एकूण पाच मागण्या ठेवल्या आहेत. यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची मागणी ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी संसदेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी निवेदन द्यावे, नीट पेपर लीचची सखोल चौकशी करावी, या मागण्यादेखील त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, आता राहुल गांधी यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.