
Indian Railways News: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवास करण्याच्या नियमात बदल केला जाणार आहे. तुमचे तिकीट कन्फर्म नसेल तर तुम्हाला जनरल डब्ब्यातून प्रवास करावे लागण्याचा नियम लागू झाला आहे. परंतु आता तुमचे तिकीट कन्फर्म नसेल तर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर प्रवेश दिला जाणार नाही. स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे हा निर्णय घेत आहे. सुरुवातीला देशातील 60 मोठ्या स्टेशनवर हा नियम लागू करण्यात येणार आहे.
मागील महिन्यात नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती. त्यात 18 जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी देशातील अनेक रेल्वे स्टेशनवर या पद्धतीच्या घटना घडल्या होत्या. मुंबईतील वांद्रे टर्मिनल येथेही या पद्धतीची घटना घडली होती. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेने नवीन नियम आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार देशातील 60 मोठ्या स्टेशनवर कन्फर्म तिकीट धारकांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यात येणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून हा प्रकल्प दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल, वाराणसी, अयोध्या आणि पटणामध्ये लागू केला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, हावडा जंक्शन, चेन्नई सेंट्रल, बेंगळुरू सिटी रेल्वे स्टेशन येथेही हा नियम लागू होणार आहे. सध्या सर्व 60 स्टेशनची यादी अजून जाहीर झालेली नाही.
सध्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर कोणतेही तिकीट असले म्हणजे दोन तास आधी जाते येते. परंतु आता ही सुविधा फक्त कन्फर्म तिकीट धारकांना मिळणार आहे. वेटिंग तिकीट किंवा जनरल तिकीट धारकास ट्रेन येण्याच्या काही वेळेपूर्वी प्लॅटफॉर्मवर सोडण्यात येणार आहे. या स्टेशनवर वेटींग एरीया असले. त्या ठिकाणी जनरल अन् वेटींग तिकीट धारकांना थांबता येणार आहे. हा नियम सध्या 60 स्टेशनवर लागू होणार आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती हळूहळू वाढवण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला.